Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर शरद पवार बोलले.
- राज्यातील भाजप नेत्यांना दिल्या कानपिचक्या.
- केंद्राच्या विचारांच्या लोकांनी तरी तारतम्य बाळगावे.
पुणे: राज्यात करोनाचा धोका कायम असताना मंदिरे उघडण्यासाठी भाजप आणि मनसे या पक्षांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली व केंद्रात सत्ता असलेल्या भाजपला कानपिचक्या दिल्या. ( Sharad Pawar On Temples Teopening )
वाचा: ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही!; पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप
करोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच येत्या काळात गणेशोत्सव व अन्य सण असल्याने महाराष्ट्रात विशेष खबरदारी घेण्यात यावी, गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावण्यात यावेत, अशी स्पष्ट सूचना केंद्र सरकारने केली आहे. त्यावर बोट ठेवत शरद पवार यांनी राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या विरोधी पक्षांना फैलावर घेतले. ‘करोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासाठी केंद्र सरकारनेच राज्य सरकारला मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. त्यानुसार आणखी काही दिवस खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकार आणि विशेषत: मुख्यमंत्री कटाक्षाने त्यात लक्ष घालत आहेत. या मार्गदर्शक तत्वांचे पालन व्हावे यासाठी ते आग्रही आहेत. तसे वारंवार आवाहनही ते करत आहेत. त्यामुळेच केंद्र सरकार एखादी भूमिका घेतं तेव्हा राज्यातील केंद्र सरकारच्या विचारांच्या लोकांनी तरी किमान तारतम्य बाळगण्याची आवश्यकता आहे’, अशा खरमरीत शब्दांत शरद पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या. मंदिरे उघडण्याबाबत अन्य घटकांची विविध मते असू शकतात. लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकारही आहे. मात्र, वस्तुस्थिती प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. मला यापेक्षा अधिक काही सांगायचे नाही, असेही पवार म्हणाले.
वाचा: करेक्ट कार्यक्रम करण्याचा राजू शेट्टींचा इशारा; शरद पवार म्हणाले…
फडणवीस काय म्हणाले होते?
‘मंदिरे उघडू नका, असे कुठेही केंद्र सरकारने सांगितलेले नाही. देशातल्या सगळ्या राज्यांनी मंदिरे उघडली आहेत. त्यामुळे आपल्या मनासारखं करायचं आणि केंद्र सरकारवर टाकायचं यांनी बंद केलं पाहिजे. या ठिकाणी मंदिरांवर जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत तसे इतर कोणत्याही राज्याने लावलेले नाहीत. उत्तर प्रदेशात मंदिरे खुली आहेत. मध्य प्रदेशात मंदिरे उघडी आहेत. छत्तीसगडमध्येही मंदिरे खुली आहेत. त्यामुळे उगाच काही कारणे देऊ नका’, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तुम्ही दारूची दुकाने उघडू शकता, मॉल उघडू शकता, सगळ्या प्रकारची हॉटेल्स उघडू शकता मग मंदिरेच का नाहीत? बाकी ठिकाणी गर्दी होत नाही आणि फक्त मंदिरातच गर्दी होते का? याबाबत वस्तुनिष्ठ विचार केला गेला पाहिजे. मी वारंवार सांगत आलो आहे की, मंदिरे उघडणे हा काही आमच्यासाठी आस्थेचा विषय नाही. आम्ही हिंदू आहोत. आमचे ३३ कोटी देव आहेत. या पिलरमध्येही आमचा देव आहे. त्यामुळे त्याकरिता मंदिरे उघडा असे आम्ही म्हणत नाही तर त्या मंदिरांवरती जे गरीब लोक अवलंबून आहेत, त्यांची आज जी उपासमार होत आहे, ती बाब तुम्ही ध्यानात घेतली पाहिजे. जो फूल विकणारा आहे, जो अगरबत्ती विकणारा आहे, जो पुजारी आहे त्याला सरकार म्हणून तुम्ही काय मदत केली? एक मोठी अर्थव्यवस्था या मंदिरांवरती आहे. हे ध्यानात घ्या, असेही फडणवीस म्हणाले होते. जेवढा विचार दारू पिणाऱ्यांचा आणि दारू विकणाऱ्यांचा करता त्याच्या पाच टक्के विचार तरी मंदिरांबाबत करायला हवा ना, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला होता.
वाचा: अनिल देशमुखांच्या जावयासोबत काय घडलं?; राष्ट्रवादीने विचारला गंभीर सवाल