Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रेचा निकाल उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात गेल्यानंतर लोकसभा मतदार संघात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवासेनेच्यावतीने ‘निर्धार मताधिक्याचा, गाव दौरा सुसंवादाचा’ अभियान आजपासून सुरू करण्यात आला आहे.या अभियानाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झालेली प्रमुख विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची पत असेल तर त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचा कमळ निशाणीवर उमेदवार द्यावा. त्या उमेदवाराचा पराभव करत २ लाखांच्या मताधिक्क्याने खासदार विनायक राऊत पुन्हा विजयी होतील, असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी येथे व्यक्त केला.
खासदार विनायक राऊत हे आपल्या भूमिकेवर कायमच ठाम राहिले आहेत. मात्र, नितेश राणेंनी नाणारच्या विरोधात विजयदुर्ग, रामेश्वर येथे घंटानाद केला. तसेच प्रारंभी नाणार येथील प्रकल्पाला विरोध दर्शविला. पण त्यांची आता नाणार समर्थनार्थ भूमिका असल्याचा टोला यावेळी नाईक यांनी लगावला.
कणकवली विधानसभा मतदार संघात मागच्या निवडणुकीत २८ हजाराचे मताधिक्य नितेश राणेंना होते. आता या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य तोडून खासदार राऊत यांना मताधिक्य मिळवून देणार आहोत. गावागावात जाऊन पदाधिकारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. खासदार राऊत यांनी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गट पक्षाचे गावागावात नवीन पदाधिकारी निवडले जातील. उपजिल्हा रुग्णालयात शिवसेनेच्या आंदोलनामुळेच ‘सी आर्म मशीन’ उपलब्ध झाली आहे. त्याचे फुकटचे श्रेय नितेश राणेंनी घेवू नये असा टोलाही सुशांत नाईक यांनी लगावला.
कणकवली येथील विजय भवन येथे गुरुवारी युवा सेनेची बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना देवगड तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, फरीद काझी आदीसह पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News