Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या जिवशी अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर सन २०१८ सालात निधी रिसर्च फर्म आणि आकाश टूर्स अँड ट्रॅव्हल्स अशा दोन कंपन्यांची आलिशान कार्यालये थाटण्यात आली. कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडला असलेल्या रामबाग लेन ३ येथील ओम दिपालया सोसायटीतील तिसऱ्या मजल्यावर राहणारा दीपक अशोक गायकवाड (४५) याने त्याच्या आकाश सुरवाडे आणि दर्शन बागुल या दोघांच्या मदतीने ही कार्यालये थाटली होती. अर्थविषयक ज्ञान असल्याने या उद्योगासाठी निधी रिसर्च फर्म नावाची गुंतवणूक कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांना वाढीव व्याजाचे आमिष दाखवून दीपक या कंपनीत गुंतवणूक करत होता.
आकाश सुरवाडे आणि दर्शन बागुल हे दोघे त्याच्या कथित कंपन्यांमध्ये भागीदार होते. शुक्रवारी १ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास दीपक गायकवाड याने अश्विनी (३२) आणि तिचा मुलगा अधिराज (७) या दोघा माय-लेकाला ठार मारून पळ काढला. महात्मा फुले चौक पोलिसांनी माग काढत या क्रूरकर्म्याला संभाजीनगरमधून दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास जेरबंद केले. या हत्याकांडामागे खूनी दीपकच्या कार्यालयात काम करणारी महिला देखील कारणीभूत असल्याचे मृत अश्विनीचा भाऊ विकेश मोरे याने पोलिसांना दिलेल्या जबानीतून उघड झाले. कार्यालयातील महिलेशी असलेले अनैतिक संबंध आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून दीपक गायकवाड याने पत्नीसह मुलाची हत्या केल्याचे समोर आले.
अश्विनीचा भाऊ विकेश याने त्या महिलेचे नाव देखील सांगितले. मात्र या महिलेवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आता याच खुनाचा बडा कारनामा पोलिसांनी नव्याने पटलावर आणला आहे. ६८२ गुंतवणूकदारांच्या वतीने बेतुरकर पाड्यातील दत्ता कॉलनीत राहणाऱ्या हर्षदा बाळकृष्ण गंभिरराव (३४) या नोकरदार महिलेने दीपक गायकवाड याचा भांडाफोड केला आहे. माझ्यासह अन्य ३८२ गुंतवणूकदारांना आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून टप्प्याटप्प्याने ३१ कोटी ६८ लाख ५४ हजार ५०० रूपये उकळले. मात्र परतावा अथवा गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता साऱ्या पैशांचा अपहार केला असल्याचा आरोप हर्षदा गंभिरराव यांनी त्यांच्या फिर्यादीत केला आहे.
पोलिसांनी या संदर्भात भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये फसवणूककांडाचा मुख्य सूत्रधार दीपक गायकवाड आकाश सुरवाडे आणि दर्शन बागुल या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नी आणि मुलाच्या खून प्रकरणी मुख्य सूत्रधार दीपक गायकवाड हा न्यायालयीन कोठडीत अर्थात आधारवाडी कारागृहात आहे. एकीकडे फसवणूककांडात त्याचे दोन साथीदार अद्याप हाती लागले नसून पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख आणि त्यांचे सहकारी शोध घेत आहेत. तर दुसरीकडे या तिघा बदमाशांनी केलेल्या कांडातून कष्ट आणि घामाचा पैसा परत कसा मिळेल ? याकडे समस्त गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या आहेत.