Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिळालेल्या माहितीनुसार, मालकाच्या मुलाचा अपहरण करून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार २३ डिसेंबर रोजी घडला होता. पोलिसांनी कसून चौकशी करत खबऱ्यामार्फत या सर्व घटनेचा पर्दाफाश केला. दुकानात काम करणाऱ्या प्रणवने मुलाचा अपहरण करून २० हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यानंतर पन्नास लाखांची खंडणी मागितली होती. होलसेल दुकानधारकाला पोलिसांनी माहिती देताच जबर धक्का बसला. सोलापूर शहर गुन्हे शाखेने या सर्व प्रकरणात एकूण पाच जणांना अटक केलं आहे. संशयित आरोपी प्रणवने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मित्रांना सोबत घेऊन हे सर्व कारस्थान केले.
रोहन श्याम वनस्कर (२१, रा. शास्त्री नगर, महादेव चौक) हा प्लंबिंगचे काम करतो. अजय अनिल कलागते (२२ रा. लतादेवी, स्वागत नगर रोड, कुमठा नाका) हा दूध विक्रीचा व्यवसाय करतो. रोहित अंकुश काटकर (२४, रा. धोबी घाट, विकास नगर, होटगी रोड) हा इस्त्रीचे दुकान चालवतो. अन्य एका तरुणाचा यामध्ये समावेश आहे. पाच जणांची मैत्री असून, ईझी मनीसाठी हा प्रताप केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली. अपहरणामध्ये प्लंबर, दूध विक्रेता, इस्त्री दुकानदार आणि अन्य एकाचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली.
सम्राट चौकातील व्यापारी बाहेती यांचा मुलगा सर्वेश बाहेती (१९) हा २३ डिसेंबर २०१३ रोजी सकाळी ६ वाजता अवंतीनगर येथील जीमला मोटारसायकलवर जात होता. तो कारंबा नाका येथील ब्रीजजवळील गतिरोधकजवळ आला असता चौघांनी त्याच्यासमोर मोटारसायकल आडवी घातली. चाकूचा धाक दाखवत त्याला मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील विजापूर बायपासजवळ नेले. तेथे त्याच्या मोबाइलमधील फोन पेवरून २० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्याच्याच मोबाइलवरून बाहेती यांना फोन केला अन् ५० लाखांची मागणी केली. पैसे मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर दोन तासांनी सर्वेशला सोडून दिले. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकामार्फत शोध घेतला जात होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्याने माहिती दिली. अपहरण आणि खंडणीमधील दोघे संशयित थांबले आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जुना पुना नाका परिसरातच दोघांना पकडले. अधिक माहिती घेतली असता हा कट बाहेती यांच्या मेडिकल दुकानातील कामगार प्रणव ठाकूरदास याच्या सांगण्यावरून केल्याचे समजले. पोलिसांनी या सर्व प्रकरणात दोन मोटारसायकली, चार मोबाइल असा एक लाख ७८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.