Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १७ सप्टेंबर २०२३ रोजी ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे’ हे अभियान सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मोहिमेची सुरुवात केली होती. या अभियानांतर्गत आतापर्यंत राज्यातील विविध आरोग्य केंद्रांवर १८ वर्षांवरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत ५६.७४ टक्के म्हणजेच २ कोटी ६५ लाख ३८ हजार ५३९ पुरुषांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यापैकी २ कोटी ५४ लाख ५८ हजार ४५९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर एकूण ३२ लाख ६६ हजार ४०२ लाभार्थ्यांना औषधोपचार करण्यात आले आहेत. २७ हजार ९७४ लाभार्थ्यांवर लहान-मोठ्या शस्त्रक्रिया विविध रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या आहेत.
या मोहिमेद्वारे केलेल्या तपासण्यांमध्ये राज्यात सर्वाधिक पुरुषांमध्ये ‘हायपरटेन्शन’चे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. सध्या राज्यात एकूण ३५ लाख ९१ हजार ३९१ इतक्या पुरुषांना हायपरटेन्शन असल्याचे दिसून आले आहे. ज्यात ठाणे जिल्ह्यात २ लाख १४ हजार ६३८ पुरुषांना हायपरटेन्शन असल्याचे समोर आले आहे. पालघर येथे १ लाख ६५ हजार ८५७ इतक्या पुरुषांना हायपरटेन्शन असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात ही संख्या सर्वाधिक ५ लाख ५३ हजार ३७ इतकी आहे. नागपूर येथे २१ हजार ७२०, नाशिक जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ५५१ इतक्या पुरुषांना हायपरटेन्शन असल्याचे समोर आले. तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात १७ हजार २९२ रुग्णांना हायपरटेन्शनच्या तक्रारी असल्याचे यावेळी समोर आले आहे.
मधुमेहींची संख्या अधिक
आरोग्य विभागातर्फे केलेल्या या तपासणीत राज्यात आत्तापर्यंत एकूण ४ लाख ४५ हजार ११५ जणांना मधुमेहाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात ३६ हजार ६५७ जणांना मधुमेह आढळून आला. हे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याचे समोर आले. पुण्यापाठोपाठ कोल्हापुरात ३६ हजार ४८ रुग्णांना, तर अकोला येथे २३ हजार ९६७ रुग्णांना मधुमेहाचे निदान झाले. मुंबईत करण्यात आलेल्या आरोग्यचाचणीत मुंबई शहरात २ हजार ८३६, तर उपनगरात ३ हजार ३१४ इतके रुग्ण आढळून आले. ठाण्यात १३ हजार ६७ रुग्णांना मधुमेह असल्याचे या तपासणीदरम्यान आढळून आले.
दोन लाख लोकांना हृदय रक्तवाहिन्यांचा विकार
– आरोग्य विभागातील आकडेवारीनुसार राज्यात एकूण एक लाख ७८ जणांना हृदय रक्तवाहिन्यांचा विकार असल्याचे समोर आले
– ७३ जणांना तोंडाचा कर्करोग असल्याचे या आरोग्य तपासणीत स्पष्ट झाले
जिल्हानिहाय आकडेवारी
जिल्हा तपासणी झालेले पुरुष
मुंबई शहर १,३७,६०२
मुंबई उपनगर २,६७,२१५
ठाणे १६,८१,२१७
पालघर ६,२२,६९०
पुणे ३१,७९,२८२
छत्रपती संभाजीनगर ११,२५,१३३
नाशिक २०,७२,९१५
नागपूर ३,६७,७२१
कोट
आरोग्य विभागातर्फे आत्तापर्यंत तीन महत्त्वपूर्ण मोहिमा राबविण्यात आल्या. यातून राज्याचे आरोग्य निरोगी व्हावे, यासाठी आरोग्य विभागाने निरोगी महाराष्ट्राचा संकल्प केला होता. या माध्यमातून जी माहिती आरोग्य विभागाकडे जमा होईल, त्यानुसार महाराष्ट्राला आरोग्यदायी बनविण्यासाठी पुढची काळजी घेतली जाईल. यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचे हेल्थ कार्ड बनविण्याच काम प्राधान्याने सुरू असून, हे कार्ड बनवण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असेल.
– तानाजी सावंत, आरोग्यमंत्री