Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आज ठाण्यात श्रीरामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राम मंदिर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करतानाच उद्धव ठाकरेंच राम मंदिरासाठी योगदान काय? असा सवाल केला. ज्यावेळी आमच्या सारखे असंख्य रामभक्त रामसेवक राम मंदिरासाठी लढा देत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे कुठल्यातरी जंगलात वाघांचे फोटो काढण्यात व्यस्त होते. कोठारी बंधुंसारखे खरे वाघ श्रीराम मंदिरासाठी बलिदान देत असताना आपण कुठे होतात? असा सवाल फडणविसांनी विचारला आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्यांनी कोठारी बंधुंना शहीद केलं, ज्यांनी रामाला नाकारलं त्यांच्या मांडीला-मांडी लावून ते बसले आहेत. मंथरेचं ऐकलं तर काय होतं हे माहिती असतानाही उद्धव ठाकरेंसोबत एक मंथरा आहे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी केली. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ होते. मात्र ठाकरे गटामध्ये कोणीही वाघ नाही. एक नेता दाखवा ज्याने राम मंदिरासाठी काम केलं आहे. ढाचा पाडताना उपस्थित असलेला एक नेता मला दाखवा. मी देखील रामसेवक होतो, हे गर्वाने सांगतो. मी विसाव्या वर्षी रामसेवेला गेलो होतो. माझ्या वजनाने बाबरी पडली म्हणतात, बाबरी तर खूप छोटी गोष्ट आहे. हिमालय देखील हलवण्याची आमच्यात ताकद आहे. रामसेवकात ही ताकद आहे. राजकीय हिंदूंनी आम्हाला हिंदूत्व सांगायच नाही. आमच्या रक्तारक्तात हिंदूत्व आहे, असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.
फडणवीस म्हणाले की, तुमच्या छातीवर चढून हे काम आम्ही करुन दाखवलं आहे. मी बदायुच्या तुरुंगात अठरा दिवस होतो. कलंकीत ढाचा जेव्हा खाली आला तेव्हा देखील मी तिथे होतो. उपमुख्यमंत्री म्हणून परिचयापेक्षा माझा परिचय रामसेवक म्हणून आधी आहे, असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर ठाण्यात येऊन आव्हाडांना सुद्धा नाव न घेता त्यांनी टोला हाणला आहे. ते म्हणाले की, ठाण्यातही एक व्यक्ती आहे. जी राम काय खातात, यावर बोलत असतात. प्रभु श्रीराम काय खात होते ते सोडा मात्र राम काय खात होता हे म्हणणारे नक्कीच शेण खात आहेत. अशा शेण खाणाऱ्यांना आता कायमचे बाजूला ठेवा, अशी टीकाही फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केली.