Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबईला समुद्रमार्गे जलदरित्या जोडण्यासाठी अशा सेतूसाठीचा विचार सत्तरीच्या दशकापासून सुरू होता. अनेक वर्षानंतर हा सेतू उभारणीला मुहूर्त येऊन तो विक्रमी वेळेत पूर्ण झाला आहे. मात्र सेतू सुरू होऊन दोन दिवस होत नाहीत तर नागरिकांकडूनच या सेतूवर नियमबाह्य कामे सुरू झाली आहेत. प्रत्यक्ष प्रवासापेक्षा सहल, मौजमस्ती म्हणून हा सेतू वापरला जात आहे.
यासंदर्भात अनेक नेटकऱ्यांनी ‘एक्स’सह समाज माध्यमांवर चिंता व्यक्त करीत छायाचित्रे टाकली आहेत. एका छायाचित्रात एक स्री व पुरुष रस्ता दुभाजकावरील शिडीवरून बिनधास्त मार्गाच्या दुसऱ्या बाजूला जाताना दिसत आहेत. तिथे आजुबाजूला अनेकजण रस्त्यावर उभे आहेत. तर अन्य एका छायाचित्रात रस्त्यात गाडी थांबवून छायाचित्र घेत आहेत. शेजारी, वापरलेले शहाळे तसेच टाकण्यात आले आहे. काही छायाचित्रांत रस्त्यावर उतरून छायाचित्र काढणे, गाडी रस्त्यावरच थांबवून बाजूच्या रेलिंगला रेटून उभे राहणे, सेल्फी काढण्याचे प्रकार होत आहेत.
छायाचित्रानुसार अशी कृत्ये करणारे सारे सुजाण नागरिक असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे नेटीझन्सकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. अशांना धरून ‘न भूतो न भविष्यती असा दंड ठोठवावा’, ‘२० हजार रुपये दंड व सहा महिने शिक्षा द्या’, ‘यांना सर्वसामान्य जाणीव का नाही’, या प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत.
सेतूवर थांबणे धोकादायक
हा सेतू ताशी १०० किमी वेगाच्या वाहनांसाठी तयार करण्यात आला आहे. सेतूची तेवढी क्षमता असून, प्रत्यक्षात कामासाठी प्रवास करणारे त्या वेगाने जात आहेत. अशावेळी केवळ सहल, मौजमस्ती, मजा करण्यासाठी सेतूवर मधेच गाडी थांबविणे, हे भीषण अपघाताला निमंत्रण ठरते. त्यामुळेच सेतूवर थांबणे हे धोकादायक असून, नैतिकदृष्ट्या व नियमाच्या दृष्टीनेदेखील चूक आहे. ‘एमएमआरडीए’ने विक्रमी वेळेत एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा सेतू उभा करून दिला आहे. त्याचा सांभाळ करणे आता नागरिकांच्या हाती आहे. तसेच पोलिसांनीही या नियम तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा ‘एमएमआरडीए’ संबंधितांनी व्यक्त केली आहे.
सेतूवर रेंगाळणाऱ्यांवर कारवाई
वांद्रे-वरळी सागरी सेतूप्रमाणेच नुकत्याच सुरू झालेल्या शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवर विनाकारण वाहन उभी करण्यास मनाई आहे. असे असतानाही गेल्या दोन दिवसांत अनेकजण वाहने कडेला लावून फोटो, व्हीडीओ, तसेच विनाकारण रेंगाळत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे
वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि त्याचबरोबर वेगात येणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत १२० वाहनचालकांवर कारवाई केली. अटल सेतूवरून प्रवास करताना वाहने धोकादायकरित्या थांबवू नयेत, असे आवाहन वाहतूक पोलिस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांनी केले आहे.