Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘मेरी झांशी नहीं दुंगी’ असा नारा देत खासदार भावना गवळी यांनी पुन्हा एकदा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघावर दावेदारी ठोकली आहे. महायुतीच्या समन्वय मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी महायुतीतील प्रतिस्पर्ध्यांना देखील साद घालीत भगिनी म्हणून बांधलेल्या पवित्र धाग्याची आठवण करून दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बहीण म्हणून आपल्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे आमदार मदन येरावार देखील मला साथ देतील. लहान बहीण म्हणून पालकमंत्री संजय राठोडांना लोकसभा लढवायची असेल तर मला त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी द्यावी अशीही मागणी त्यांनी केली. तर पुसदचे राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्यात एक लोकसभा मतदारसंघ बंजारा समाजासाठी सोडावा, असे सांगत यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर अप्रत्यक्ष दावा ठोकला. त्यामुळे आजच्या महायुतीच्या मेळाव्यात यवतमाळ वाशीम जागेवरून दावे प्रतिदावे पाहायला मिळाले.
एकनाथ शिंदे ‘कर्ण’, अजितदादा ‘दबंग’, फडणवीस ‘चाणक्य’: भावना गवळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून अजित पवार हे महायुतीत सामील झाले. या देशातील राजकारणही दादांनी पाहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या राज्यातील त्रिमूर्ती आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत. कोणीही गेला, बच्चूभाऊ गेले, १०० कोटी मागितले तर देऊन टाकले. इकडे आठवले साहेबांनी काही मागितलं देऊन टाकलं. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना ‘कर्ण’ या उपाधीने सन्मानित करते. हे सरकार तयार करण्यात आमचे चाणक्य असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. तर अजित पवार हे या सरकारमधील दबंग आहेत, त्यांची दादागिरी सगळीकडे चालते. आपल्याला नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान बनवायचे आहे, असेही भावना गवळी यांनी म्हटले.
पुन्हा घातली राखीची आर्त साद
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खा. भावना गवळी यांची ‘राखी’ बहूचर्चित आहे. यापूर्वी त्या चारदा खासदार असतानाही त्या रक्षाबंधनाला मतदार राजा असो अथवा राजकीय नेत्यांना राखी पाठवायला विसरत नसतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मूळ शिवसेनेत असताना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय नेत्यांना राखी बांधत ‘भैय्या राखी के बंधन को निभाना’, अशी अनेकदा आर्त साद घातली. या निवडणुकीतही त्यांचा तोच कित्ता असल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघावर बंजारा समाजाचा दावा करताच खा. गवळी यांनी बहिणीची कोणतीच अडचण नाही, कुठेही हस्तक्षेप नसल्याचे म्हणत भावनिक सादही घातली.