Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- भारतात राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच.
- सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला दावा.
- हिंदू हे जातिवाचक अथवा भाषावाचक नाम नाही.
मुंबई: ‘आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. आमच्या दृष्टीने हिंदू हा मातृभूमी, पूर्वज, तसेच भारतीय संस्कृतीचा वारसा याचा प्रतिशब्द आहे. हिंदू हे कुठलेही जातिवाचक अथवा भाषावाचक नाम नसून, जगातील प्रत्येक व्यक्तीचा विकास, उत्थान आणि मार्गदर्शन करणाऱ्या परंपरेचे नाव आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी केले. ‘ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या ‘राष्ट्र सर्वप्रथम राष्ट्र सर्वोतोपरी’ या व्याख्यानात त्यांनी हे विचार मांडले. ( Mohan Bhagwat On Hindu Muslim )
वाचा:…तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती
‘हिंदू धर्माची ही व्याख्या ज्या कुठल्या पंथातील, धर्मातील, भाषेतील नागरिक मानतात, त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो. दुसऱ्यांच्या मतांचा इथे अनादर होणार नाही. मात्र मुस्लिम वर्चस्वाचा नाही, तर भारताच्या वर्चस्वाचाच विचार करणे महत्त्वाचे आहे. देशाला पुढे नेण्यासाठी सगळ्यांना सोबत घेऊनच पुढे जावे लागेल’, असेही भागवत म्हणाले. या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान व काश्मीर केंद्रीय विश्व विद्यालयाचे कुलपती तसेच, निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अटा हुसैन यांनीही विचार मांडले.
वाचा: करोना संकट: महाराष्ट्राने केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी
भारतात इस्लाम हा आक्रमकांच्या सोबतच आला. हाच इतिहास आहे व तसेच सांगणे गरजेचे आहे. मुस्लिम समाजातील समजूतदार नेतृत्वाने आततायी विचारांचा विरोध करणे गरजेचे आहे. त्यांना धर्मातील कट्टरपंथीयांसमोर ठोस भूमिका घ्यावी लागेल. हे काम दीर्घकालीन प्रयत्न, तसेच प्रचंड हिंमतीसह करायला हवे. आपल्या सगळ्यांची परीक्षा खूप मोठी व खडतर आहे. आपण जितकी लवकर सुरुवात करू, तितके समाजाचे नुकसान कमी होईल. भारत महाशक्ती बनेल तर ते कुणाला घाबरवण्यासाठी नसेल, तर तो विश्वगुरू म्हणून महाशक्ती बनेल. युगानयुगे आम्ही सजीव आणि निर्जीव सर्वांच्याच उत्थानासाठी कार्यरत आहोत. त्यामुळे भारत महाशक्ती होण्याची कोणालाही भीती वाटण्याची गरज नाही, असे भागवत यांनी नमूद केले.
इथे कोणीही परका नाही…
जगातील ज्या-ज्या ठिकाणाहून वैविध्य नष्ट झाले तिथे वाईट गोष्टींचा जन्म झाला. जगात जिथे वैविध्य आहे, तिथे तिथे संपन्नता आहे. भारतीय संस्कृतीत कुणालाच परके मानले जात नाही, कारण या संस्कृतीतच सगळे समान आहेत, असे मत अरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले. पाकिस्तानने १९७१ नंतर भारताला रक्तरंजित करण्याचे एक कारस्थान रचले. भारत सरकार, सेना, पोलिस यांनी हे कारस्थान गेल्या ३० वर्षांत उद्ध्वस्त केले. परंतु बदलत्या परिस्थितीत पाकिस्तानकडून भारतीय मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता असून भारतीय मुस्लिम बुद्धिवाद्यांनी याबाबत सतर्क राहायला हवे, असे आवाहन सय्यद अटा हुसेन यांनी व्यक्त केले.
वाचा: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘हा’ मोठा दिलासा