Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्राच्या राजकारणात थेट वलय असलेले आणि सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडून राहिलेले व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले उदयनराजे भोसले आणि फलटणचे राजे रामराजे नाईक निंबाळकर यांची काल सायंकाळी फलटण येथील लक्ष्मी विलास निवासस्थानी भेट झाली.
फलटणमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या फलटण येथील सभेसाठी आलेले खासदार उदयनराजे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचा टेकऑफ होताच रामराजेंच्या भेटीला थेट लक्ष्मीविलास निवासस्थानी पोचले. यावेळी उदयनराजे चिडले की बर वाटतं, हसले की पोटात गोळा येतो, असा मिश्किल टोला परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हसत हसत उदयनराजे यांना लगावला. त्याला उदयनराजे भोसले यांनी हसत हसत दाद दिली! यावेळी औपचारिक चर्चा करत या भेटीचे फोटो काढण्यात आले. त्यानंतर या दोन्ही राजांची तब्बल अर्धा तास कमरा बंद चर्चा झाली. ही चर्चा आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झाली असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात असून, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
उदयनराजे यांनी रामराजेंची भेट घेतल्यामुळे माढा व सातारा लोकसभा निवडणुकीत रामराजे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोघा जणांची जवळीक वाढल्याचे चित्र दिसत आहे. ही जवळीक कुणाला मारक तारक ठरणार? असाही प्रश्न या भेटीने उपस्थित होत आहे.
उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडेपर्यंत दोन्ही राजेंमध्ये झालेल्या टोकाच्या वादांचा साक्षीदार पूर्ण महाराष्ट्र आहे. स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दोघांतील वाद मिटवण्यात त्यांनाही यश आले नव्हते. काही महिन्यांपूर्वी सातारा शासकीय विश्रामगृहात तर आज झालेल्या फलटण येथील रामराजे यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीमुळे लोकांच्या भुवया उंचावल्यात. गेल्या काही दिवसांपासून दोघातील मतभेद संपले असल्याचे दिसत आहे. हे दोघे एकमेकांविषयी मान राखत आदबीने बोलत असल्याचे काही कार्यक्रमांमध्ये दिसून आले होते. मध्यंतरी तर हे दोघे पुण्यातील एका विवाह सोहळ्यात समोरासमोर आले होते, तेव्हा तर सर्वांसमक्ष दोघांची गळाभेटही झाली होती.
रामराजे आणि उदयनराजे यांच्या वादाचा इतिहास पाहिला तर हा वाद गेल्या पाच सात वर्षांपासून सुरू होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच तिकिटावर मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले उदयनराजे अचानक खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले होते.
आज माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर वचनपूर्ती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर उदयनराजे यांचा ताफा थेट रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या लक्ष्मीविलास पॅलेसवर दाखल झाला आणि रामराजेंच्या निवासस्थानी उदयनराजे यांनी अचानकपणे भेट घेऊन सुमारे अर्धा तास कमरा बंद चर्चा केली. तत्पूर्वी या दोघा जणांनी एकमेकांना नमस्कार करून आदबीने विचारपूस केली. स्मित हास्य करीत फोटोसाठी पोज सुद्धा दिली. गेल्या काही दिवसांपासून या दोघांची जवळीक वाढल्याचे चित्र दिसत आहे. ही जवळीक कुणाला मारक ठरणार, असा प्रश्न राजे प्रेमींना पडला आहे. काल औपचारिक गप्पा मारताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेक राजकीय विश्लेषण करून राजकारणातील डावपेचबाबत राजकारण कसे असते? याची विनोदी शैलीने मांडणी केली.
२०१९ मध्ये उदयनराजे भोसले यांनी शरद पवार व रामराजे यांच्यावर टीका करताना घरचा आहेर देत म्हटले होते की, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्यांना पाणी न देता ते पाणी दुसऱ्यांना दिले. ज्या मतदारांच्या जोरावर निवडून आले, त्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवले. तसेच खंडाळा तालुक्यातील लोणंद येथील सोना अलाईज कंपनीच्या कामगार युनियन वादावरून फलटण येथे जाऊन उदयनराजेंनी निंबाळकर घराण्याबद्दल आक्रमक भूमिका घेत रामराजे यांना खुले आव्हानच दिले होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपूर्वी महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवारांची एंट्री झाली अन् राजकीय समीकरण बदलण्यास सुरुवात झाली. त्याचाच हा परिपाक म्हणून उदयनराजे आणि रामराजे यांची जवळीक वाढू लागली आणि अखेर साताऱ्यातील या दिग्गज दोन्ही राजेंमधील दुरावा मिटला असल्याची चर्चा सुरू झाली.
Read Latest Maharashtra News And Marathi News