Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
स्कूल कनेक्ट संपर्क अभियानासाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अपेक्षित वाटचाल करत असताना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय आणि विविध शिखर संस्थांच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व बिगर स्वायत्त ८१२ महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठामार्फत तीन आणि चार वर्षाचे सर्व विद्याशाखेचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून या पदवी अभ्यासक्रमांचा श्रेयांक आराखडा तयार करण्यात आला आहे. या शैक्षणिक वर्षापासून बारावी उत्तीर्ण झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पदवीच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेताना विद्यापीठाने ठरवून दिलेल्या ६ व्हर्टिकल ( घटक) नुसार विद्यार्थ्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, व्होकेशनल स्कील कोर्सेस, एबिलिटी एनहान्समेंट कोर्सेससह भारतीय ज्ञान प्रणाली आणि कार्यांतर्गत प्रशिक्षण अश्या सहा व्हर्टिकल मधील विषय शिकण्यास विद्यार्थ्यास प्रोत्साहन देऊन महाविद्यालयांनी मार्गदर्शन करावे अशी सूचनांही त्यांनी यावेळी केली.
स्कूल कनेक्ट( NEP कनेक्ट) या संपर्क अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यशाळेसाठी मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. किशोरी भगत, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. शिवराम गर्जे, सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अनिल सिंह, अंतर्गत गुणवत्ता हमी योजना कक्षाच्या समन्वयक प्रा. स्मिता शुक्ला यांच्यासह विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि सहयोगी अधिष्ठाता यावेळी उपस्थित होते.
दिनांक १७ जानेवारी रोजी ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेला सकाळच्या सत्रात १४७ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी तर दुपारच्या सत्रात ३५७ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सीकेटी महाविद्यालय पनवेल येथे सकाळच्या सत्रात १२० हून अधिक वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी तर दुपारच्या सत्रात १४० हून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पालघर सारख्या कमी सकल नोंदणी प्रमाण असलेल्या जिल्ह्यात या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ११० वरिष्ठ महाविद्यालये आणि दुपारच्या सत्रात ४०० हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. १८ जानेवारी रोजी पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुढील संपर्क अभियानकार्यशाळा २३ जानेवारी रोजी रत्नागिरी आणि २४ तारखेला सिंधुदुर्ग येथे आयोजित केल्या जाणार आहेत.