Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बहुचर्चित विरार-अलिबाग कॉरिडोर ३० महिन्यांत उभारणार; १८ हजार २२५ कोटींची निविदा

11

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

बहुचर्चित विरार-अलिबाग कॉरिडोर ११ टप्प्यांत उभारला जाणार आहे. यासाठी १८ हजार २२५ कोटी रुपयांच्या बांधकामाची निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएमआरडीए) काढली आहे. एकूण ९६.४८ किमी लांबीचा हा बहुआयामी मार्ग ३० महिन्यांत उभारण्याची अट निविदेत आहे.

मुंबई महानगर प्रदेशच्या वसई-विरार या उत्तर भागातील वाहनांना पुणे किंवा कोकणच्या दिशेने जाण्यासाठी ठाणे घोडबंदर मार्ग व नवी मुंबईतील रस्त्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे ठाणे व नवी मुंबई परिसरात पनवेलपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ही गर्दी टाळून उत्तर मुंबईतील नागरिकांना थेट कोकणात जाता यावे, यासाठी विरार-अलिबाग बहुआयामी कॉरिडोरचे नियोजन राज्य सरकारने केले होते. त्यानुसार हा कॉरिडोर उभारण्यासाठी प्राथमिक पात्रता पडताळणी ‘एमएसआरडीसी’ने याआधी केली होती. त्यात पात्र ठरलेल्या कंपन्यांसाठी आता प्रत्यक्ष बांधकामाची निविदा काढण्यात आली आहे.

हा विशेष महामार्ग एकूण ११ टप्प्यांत उभारला जाणार आहे. या महामार्गाची सुरुवात वसई तालुक्यातील नवघर येथून होणार असून पेण तालुक्यातील बळवलीपर्यंत तो असेल. बांधकामाचा पहिला टप्पा वसई तालुक्यातील बापने गावापासून भिवंडी तालुक्यातील पाये गावापर्यंत असेल. तर, ११वा व अखेरचा टप्पा रायगड जिल्ह्यातील चिरनेरपासून उरण तालुक्यातील गोविर्लेपर्यंत असेल. या बांधकाम निविदेची अखेरची तारीख १ मार्च आहे. ४ मार्चला निविदा उघडली जाणार आहे. सर्व ११ पॅकेजमधील संबंधित कंत्राटदारांना ३० महिन्यांच्या कालावधीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण करणे अत्यावश्यक असेल. याबाबत ‘एमएसआरडीसी’चे संबंधित मुख्य अभियंता एस. के. सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कॉरिडोरचे पॅकेज

पॅकेज क्रमांक कुठून-कुठे अंतर (किमी) अंदाजित खर्च (कोटी रुपयांत)

१ बापने-पाये ८.३९ १७८५

२ पाये-काल्हेर १२.३९ १७९३

३ काल्हेर-अंजूर ५.२८ ७६५

४ अंजूर-कल्याण ६.३१ १८५०

५ काटई-नितळस ८.४४ १८९९

६ नितळस-उमरोली १२.८३ १९११

७ उमरोली-बोर्ले ८.२४ १९७५

८ बोर्ले-वडघर ८.३४ १५२४

९ वडघर-जांभूळपाडा ९.१२ १५७३

१० जांभूळपाडा-कळंबसुरे ९.३३ १६१३

११ कळंबसुरे-गोविर्ले ७.७९ १५३२

एकूण ९६.४८ १८,२२५

पूर्णपणे हरित मार्ग

हा मार्ग पूर्णपणे हरित असेल. ज्या भागातून हा मार्ग किंवा कॉरिडोर तयार होणार आहे, त्या भागात सध्या एकही रस्ता नाही. त्यामुळेच हा ‘ग्रीन फिल्ड’ असा नवा महामार्ग तयार केला जाणार आहे. केवळ विरार व अलिबाग यांना थेट जोडणारा हा महामार्ग असेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.