Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जनसागर मुंबईकडे रवाना; जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात मराठवाड्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग
मराठा आरक्षणाचा मुद्दा मागील पाच महिन्यांपासून अधांतरी आहे. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली आणि छत्रपती संभाजीनगर येथे तीन वेळा भेट घेऊन उपोषण सोडण्यासाठी शिष्टाई केली होती. मराठा आरक्षणासाठी राज्यभर कुणबी नोंदी तपासण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ५४ लाख नोंदी सापडल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र, नवीन नोंदी किती सापडल्या याची माहिती दिली नसल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप आहे. मराठा आरक्षणासाठी दिलेल्या मुदतीनंतरही आरक्षण मिळाले नसल्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी जाहीर केला. या आंदोलनात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशीव, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातील हजारो समर्थक सहभागी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वीच पाठविण्यात आला होता. हा पुतळा मुंबईपर्यंत रॅलीत असणार आहे.
दरम्यान, शहरातील काही कार्यकर्ते अंतरवाली येथे शनिवारी मदतीसाठी पोहचले होते. मुंबईपर्यंतच्या वाटचालीचे नियोजन करून कार्यकर्ते परतले आहेत. जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाल्याची माहिती समन्वयकांनी दिली आहे.
आरक्षणानंतरच मुंबई सोडण्याचा निर्धार
लातूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील उपोषणास पाठींबा देण्यासाठी लातूर शहर व जिल्ह्यातून शेकडो वाहनांनी हजारो मराठा समाजबांधव शुक्रवारी रात्री आंतरवाली सराटीला रवाना झाले. उर्वरीत बांधव २३ व २५ जानेवारी रोजी मोठ्या संख्येत ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो खासगी व सार्वजनिक वाहनांनी मुंबईस जाणार आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा आम्ही निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते आंतरवाली सराटीस रवाना झाले. शनिवारी पहाटे ते आंतरवाली सराटीला पोहचले. रवाना झालेल्या नागरिकांनी त्यांना महिनाभर पुरेल एवढा शिधा सोबत घेतला आहे. आचारीही सोबत आहेत. आता आरक्षण मिळाल्यानंतरच आम्ही परत येवू असा निर्धार आम्ही केला असल्याचे त्यांनी सांगितले.