Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डॉ. वैद्य हे पोथ्यांच्या डिजिटायझेशनमधून नाशिकच्या दुर्मिक साहित्य आणि संस्कृतीचा ठेवा जतन करण्याचा अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सहा लाखांहून अधिक पोथ्यांच्या पानांचे डिजिटायझेशन करून पोथ्यांना पुनर्जीवन मिळवून दिले आहे. त्यांच्या या कामाची दखल गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसह देश-विदेशातील संस्थांनी पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली आहे. मात्र, अयोध्येच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडील श्रीरामाशी संबंधित २५ पेक्षा अधिक पोथ्यांनी विशेष लक्ष वेधले आहे. याबाबत डॉ. वैद्य सांगतात,‘नाशिककरांप्रमाणेच श्रीकाळारामावर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे पोथ्यांना जपण्याचा छंद जडला तेव्हापासून श्रीरामाशी मिळालेल्या सर्व पोथ्या जपण्याचा प्रयत्न केला आहे. या २५ पोथ्या अगदी पाच पानांपासून ८० पानांपर्यंत आहेत. या साधारण अडीचशे ते तीनशे वर्षे जुन्या आहेत. पोथ्या साधारण त्या देवतेच्या स्तुतीपर व माहात्म्य सांगणाऱ्या आहेत.
श्रीरामाशी संबंधित पोथ्यांतून श्रीरामाचे माहात्म्य, स्तुतीचा जागर स्रोतातून करण्यात आला आहे. यात १७६४ मधील हस्तलिखित ‘रामायण माहात्म्य’मध्ये श्रीरामाची महती आहे, तर ४३५ वर्षे जुन्या असलेल्या ‘रामपद्धती’ या पोथीत श्रीरामाच्या पूजनाच्या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. देवतेच्या भक्तीप्राप्तीसाठी रामहृदयस्तोत्र, १६१७ मधील रामरक्षा कवच, राजोपचाराशी व नित्य पूजेशी संबंधित रामार्चान चंद्रिका, रामस्रानाम स्तोत्र, रामषडाक्षर जप, रामरक्षाव्याख्या, शतश्लोकी रामायण, रामाष्टक, सप्तश्लोकी रामायण, रामरहस्य उपनिषध अशा पोथ्यांमधील श्रीरामाची स्तुतीवर श्लोक पोथ्यांमध्ये आहेत. यात ‘रामखड्गमाला’ ही पोथी दुर्मिळ असून, रामतंत्राशी निगडीत आहे, असे डॉ. वैद्य सांगतात.
‘रामगीते’त राम-लक्ष्मण संवाद
श्रीरामाशी संबंधित पोथ्यांमधून श्रीरामाची महती मांडण्यात आली आहे. यातील ‘रामगीता’ ही पोथी श्रीराम आणि लक्ष्मणाच्या संवादातून साकारण्यात आली आहे. हा संवाद दुर्मिळ ठरतो. तर बिभिषणकृत रामस्तोत्र ही रावणाच्या वधाच्या वेळी बिभिषणाने रामाची स्तुतीवर रचली आहे. तसेच ‘जटायूकृत रामस्तोत्र’, इंद्रकृत रामस्तोत्र, नारदाने ब्रह्माला सांगिलेली ‘रामनूस्तृती’, ‘ब्रह्मदेवकृत रामस्तोत्र’, रामाच्या जन्मापासून शरयूप्रवेशापर्यंतच्या श्रीरामाच्या लिला सांगणारी ‘रामलिला सहस्त्रानाम’ या पोथ्याही श्रीरामाची महती अनोख्या पद्धतीने सांगतात, अशी माहिती डॉ. वैद्य देतात.
श्रीरामाशी संबंधित पोथ्यात फक्त पूजेचा विषय नसून, भक्तीभाव, संवाद, स्तृतीच्या माध्यमातून श्रीरामाचे वर्णिलेले माहात्म्य अनोखे ठरते. या पोथ्यांचे जतन करण्यात आले असून, या पोथ्यांचा अभ्यास व्हायला हवा. ठसकेबाज आणि वळणदार अक्षरांमुळे या पोथ्या अनोख्या ठरतात.- डॉ. दिनेश वैद्य, पोथ्यांचे संग्रहक