Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उदयनराजेंची तयारी सुरू, श्रीनिवास पाटील पुन्हा मैदानात? साताऱ्यात लोकसभेला काय होणार?

23

सातारा : सातारा जिल्ह्यात माढा आणि सातारा हे लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यापैकी सातारा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. यात सातारा, वाई-खंडाळा-महाबळेश्वर, कोरेगाव, पाटण, उत्तर कराड, दक्षिण कराड समावेश आहे. २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेत हा बदल झाला आहे. पूर्वी कराड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता, तो पुनर्रचनेत सातारा लोकसभा मतदारसंघात विलीन झाला आणि नव्याने माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. यात सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा भाग सामावून हा मतदारसंघ तयार करण्यात आला.

सातारा लोकसभा मतदारसंघावर १९९६ मध्ये शिवसेनेचे उमेदवार हिंदुराव नाईक निंबाळकर हे निवडून आले होते. हा अपवाद वगळता या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले होते, मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उदयनराजे यांचा पराभव होऊन श्रीनिवास पाटील हे विजयी झाले.

वेध लोकसभा निवडणुकीचा : तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!
सातारा लोकसभेवर ठाकरे गट वगळता सगळ्याच पक्षांचा दावा!

आगामी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसत आहे. सातारा लोकसभा मतदारसंघावर सध्या राज्यात महायुतीत असलेल्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजपा व घटक पक्ष तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व घटक पक्ष आपला दावा सांगत आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महायुती व महाआघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : बारामतीत यंदा भाजप उमेदवार देणार की दादांचा उमेदवार सुप्रियाताईंना नडणार?
गेली २५ वर्ष हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पारंपारिक युतीमध्येही ही जागा शिवसेनेला सोडण्यात येते. यावेळीही सातारा लोकसभा ही शिवसेनेने लढावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. शिवसेनेसाठी पोषक वातावरण असून शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा दिला असल्याचे जाधव यांच्याकडून सांगण्यात येते. त्यानंतर पुरुषोत्तम जाधव यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले असून, अनेक गावात विकासकामे हाती घेत अनेक ठिकाणी विकास निधी देऊन कामे सुरू केली आहेत.

त्यानंतर शिवसेनेप्रमाणे सातारा लोकसभेवर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही दावा केला आहे. कर्जतमधील मेळाव्यात अजित पवार यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले होते.

वेध लोकसभा निवडणुकीचा : शिर्डीत महायुतीची ताकद पण पवार-ठाकरेंना मोठी सहानुभूती, लोकसभेला काय होऊ शकतं? वाचा…
अजित पवार यांच्या या दाव्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी साताऱ्यातून भाजपचाच उमेदवार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळेच सातारा लोकसभेवरून महायुतीत चांगलाच कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

या मतदारसंघात भाजपकडून राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चिन्हे आता दिसत आहेत. या कलगीतुऱ्यानंतर नुकत्याच झालेल्या महायुतीच्या महामेळाव्यात सर्वच पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी झाला का? हा प्रश्न जरी गौण असला तरी उदयनराजे भोसले यांची बॉडी लँग्वेज पाहता ही जागा पारंपरिक मित्रपक्ष शिवसेनेला देण्याऐवजी भाजपालाच मिळू शकते, हे जवळजवळ निश्चित झाले असल्याचे बोलले जात आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : खोतकरांची तलवार म्यान, विरोधकांकडे उमेदवारांची शोधाशोध, तोडीचा प्रतिस्पर्धी नाही, दानवे निवांत!
उदयनराजे भोसले यांचे मतदारसंघातील मेळावे, वाढलेले दौरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे झालेली भेट आणि मोदी यांच्यावर वाहिलेली स्तुतीसुमने अशा अनेक घटनांचे बारकाईने निरीक्षण केले, तर उदयनराजे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले. सातारा, माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे पक्ष निरीक्षक, केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनीही आपले मौन बाळगून उदयनराजे यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिल्याचे दिसत आहे.

मविआमध्ये कोणत्या हालचाली?

दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार करता राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व घटक पक्षाचा विचार करता अजून उमेदवार निश्चित झाले नाहीयेत. नुकतेच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत चर्चा झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील, सत्यजित पाटणकर यांच्या नावाची चर्चा झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना तुम्ही कोणताही उमेदवार द्या आम्ही त्याला निवडून आणू, असे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : शिरूर लोकसभेसाठी अनेक इच्छुक, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना आव्हान, उमेदवार कोण?
त्यानंतर काही मतमतांतरे आणि महायुतीचा उमेदवार पाहता विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांना पुन्हा उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना केल्याचे बोलले जात आहे. त्यातच खासदार श्रीनिवास पाटील यांच्या वयाचा विचार करता ऐनवेळी स्ट्रॉंग उमेदवार म्हणून काँग्रेसचे दक्षिण कराडचे विद्यमान आमदार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही तिकीट देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्याकडून केली गेली आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे यापूर्वी दोन वेळा कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले आहेत. पण चव्हाण हे राज्यातच काम करण्यास इच्छुक असल्याने ते निवडणूक लढतील का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस वगळता इतर घटक पक्षातील प्रबळ उमेदवार अद्याप तरी समोर आल्याचे दिसत नाही.

वेध लोकसभा निवडणुकीचा : ठाकरेंचे पाठीराखे संजय जाधव यांचा कस लागणार, महायुतीत ‘रेस’, परभणीत चित्र काय?
कोणकोणते विधानसभा मतदारसंघ?

सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश केला आहे. लोकसभा व विधानसभा मतदारसंघ २००८च्या आदेशानुसार रचना करण्यात आली आहे. २५६ वाई विधानसभा, २५७ कोरेगाव विधानसभा, २५९ कराड उत्तर विधानसभा, २६० कराड दक्षिण विधानसभा, २६१ पाटण विधानसभा आणि २६२ सातारा विधानसभा मतदारसंघाची नावे आहेत.

कोणत्या पक्षाचे कुठे आमदार?

सातारा विधानसभा मतदारसंघात संपूर्ण जावळी तालुका व सातारा तालुक्यातील वर्ये, दहीवड, परळी, अंबर्डे, शेंद्रे, सातारा ही महसूल मंडळे आणि सातारा नगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे. भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

वेध लोकसभा निवडणुकीचा : काँग्रेस बालेकिल्ला काबिज करणार की भाजप बाजी मारणार? वंचित-बीआरएस भूमिकेकडे लक्ष
कराड उत्तर मतदारसंघात खटाव तालुक्यातील पुसेसावळी महसूल मंडळ, कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली, रहिमतपूर ही महसूल मंडळे आणि रहिमतपूर नगरपालिका, सातारा तालुक्यातील अपशिंगे व नागठाणे ही महसूल मंडळे तर कराड तालुक्यातील इंदोली, मसूर, उंब्रज व कोपर्डे हवेली या महसूल मंडळांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील हे विद्यमान आमदार आहेत.

कराड दक्षिण मतदारसंघात कराड तालुक्यातील कोळे, उंडाळे, काळे, शेणोली, कराड ही महसूल मंडळे व कराड नगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण हे आमदार आहेत.

कोरेगाव मतदारसंघात खटाव तालुक्यातील पुसेगाव व खटाव ही महसूल मंडळे, कोरेगाव तालुक्यातील सातारारोड, किन्हई, कुमठे व कोरेगाव ही महसूल मंडळे आणि सातारा तालुक्यातील वडुथ, खेड व तासगाव या महसूल मंडळांचा समावेश आहे.
शिवसेनेचे महेश संभाजीराजे शिंदे हे विद्यमान आमदार आहेत.

पाटण मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील संपूर्ण पाटण तालुका व कराड तालुक्यातील सुपने महसूल मंडळाचा समावेश होतो. शिवसेनेचे शंभूराज शिवाजीराव देसाई हे विद्यमान आमदार आहेत.

वाई मतदारसंघात संपूर्ण वाई, खंडाळा व महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद लक्ष्मणराव जाधव हे वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

कोल्हापूरच्या जागेवरुन तिढा, मविआच्या तिन्ही पक्षांची दावेदारी, उमेदवार कोण असणार? महायुतीमध्येही संभ्रम

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.