Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अयोध्येत सोमवारी राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. महाराष्ट्रातही भाजपकडून या सोहळ्यासाठी जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. त्यासाठी अयोध्येला गेलेल्या कार सेवकांच्या अनुभव कथनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही मी तरुण वयात कार सेवेसाठी अयोध्येत गेलो होतो, असा दावा अनेकदा केला आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा मी त्याठिकाणीच होतो, असेही फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु, विरोधक त्यांच्या या दाव्याची कायमच खिल्ली उडवत आले होते. मात्र, आता फडणवीसांनी कार सेवेसाठी जातानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत लिहलेल्या कॅप्शनमध्ये फडणवीसांनी म्हटले आहे की, ‘जुनी आठवण…नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे… नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे’, असे फडणवीसांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर आता विरोधक त्यावर काय प्रतिक्रिया देणार, याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.
अयोध्येला चढला रामरंग
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अवघे दोन दिवस उरलेले असताना शनिवारी मंदिराला ताज्या टवटवीत फुलांनी आणि विशेष रोषणाईने सजविण्यास सुरुवात झाली. संपूर्ण अयोध्या सजली असून, शहराला धार्मिक रंग आला आहे. स्थानिकांच्या भाषेत ‘अयोध्या राममय हो रही है.’
‘राम मंदिराला नैसर्गिक फुलांनी सजविण्यात आले आहे. हिवाळ्यामुळे ती जास्त वेळ टवटवीत राहू शकतात. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवसापर्यंत ती ताजी राहतील. फुलांचा दरवळ आणि सौंदर्यामुळे मंदिराच्या पावित्र्यात आणखी वाढ झाली आहे,’ अशी भावना मंदिराच्या विश्वस्तांनी व्यक्त केली. फुले आणि रोषणाईच्या सजावटीच्या दोन वेगळी पथके नेमण्यात आली आहेत. मंदिराच्या गर्भगृहात मात्र पारंपरिक दिवेच लावले जाणार आहेत.