Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
धाराशिव लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसच्या उमेदवारांचं इथे वर्चस्व राहिलेलं आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख धाराशिव लोकसभा मतदारसंघाची होती. पण याच मतदारसंघात शिवसेनेने ४ वेळेस मुसंडी मारुन विजयश्री खेचून आणली. एक वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने विजय संपादन आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर बार्शी येथील शिवाजी बापु कांबळे, कळंबच्या कल्पना नरहिरे, उमरगा येथील प्रा रविंद्र गायकवाड, गोवर्धनवाडी येथील विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे निवडून गेले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर माजी मंत्री डाँ पद्मसिंह पाटील हे निवडून गेले आहेत. वरील ५ उमेदवार वगळता उर्वरित कालखंडात वेगवेगळे उमेदवार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून गेले आहे.
मुख्य लढतीची शक्यता काय?
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय भारतीय जनता पार्टीने केलाय. यासाठी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न भाजपा करतंय. युतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे धाराशिव लोकसभेची जागा शिवसेनेला आहे. पण या जागेवर भाजपा दावा करु शकते. उमेदवार म्हणून तुळजापुरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देऊ शकतात.
शिंदे गटाकडून माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी या जागेवर दावा केला असून आपणच उमेदवार असणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. मात्र आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे, जिल्हा परिषद धाराशिवचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत हे सुध्दा लोकसभा लढविण्यास इच्छुक आहेत. डॉ. तानाजी सावंत आपल्या पुतण्यासाठी जोरदार लॉबिंग करतायेत. त्यामुळे त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जातीये. एकंदर ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार असण्याची जास्त शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या निंबाळकरांची बलस्थाने कोणती?
साधारण पावणे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत दोन गट पडले. त्यावेळी शिवसेनेच्या अनेक एकनिष्ठ नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. परंतु ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांना साथ न सोडण्याचा निर्णय घेतला. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी सहानुभूतीची लाट आहे. शिवाय खासदार निधीतून कामं केल्याने त्यांना मतदारांचा प्रसिसाद देखील मिळतो आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मतदारसंघात असलेला त्यांचा तगडा जनसंपर्क… एका फोनवर होणारी लोकांचे कामे.. अशी त्यांची बलस्थाने आहेत.
महायुतीची ताकद जास्त
महाविकास आघाडीकडे फक्त कळंब-धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे एकमेव आमदार आहेत. बाकीचे इतर मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे असल्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी अधिक त्रास घेण्याची आवश्यकता नाही. १९९४ पासून धाराशिव मतदारसंघातील मतदारांनी लोकसभेसाठी नेहमी वेगवेगळ्या उमेदवारांना संधी दिली आहे. हीच परंपरा पुढे चालू राहते की मतदार निंबाळकरांना पुन्हा लोकसभेत पाठवतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
विधानसभा मतदारसंघ
बार्शी- आमदार राजेंद्र राऊत (भाजपा पुरस्कृत)
परंडा-भुम-वाशी- आमदार डॉ. तानाजी सावंत (शिंदे गट)
कळंब-धाराशिव- आमदार कैलास घाडगे पाटील (ठाकरे गट)
तुळजापूर – आमदार राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
लोहारा-उमरगा – आमदार ज्ञानराज चौगुले (शिंदे गट)
औसा- आमदार अभिमन्यु पवार (भाजप)
निलंगा- आमदार संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)