Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बाहेरी, अंतरी… राम चराचरी; प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आज नागपुरात जागोजागी थेट प्रक्षेपण

7

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : अणुमाजी राम, रेणूमाजी राम।तृणी काष्ठी राम वर्ततसे बाहेरी अंतरी राम चराचरी। विश्वी विश्वकार व्यापलासे
असे वातावरण सर्वत्र झाले आहे. रामभक्तांचा ५०० वर्षांचा वनवास आज संपणार आहे. अयोध्या येथील बहुप्रतिक्षित राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मंदिरे, चौकांमध्ये दिवसभर रामयाग, महाआरती, प्रसाद वाटप होणार आहे. जागोजागी अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार असून सायंकाळी दीपोत्सवाने या ‘न भुतो’ सोहळ्याची सांगता होणार आहे.

२२ जानेवारीला अयोध्या येथील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याचे निश्चित झाल्यापासूनच वातावरणनिर्मितीला सुरुवात झाली होती. गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण शहर भगवामय झाले आहे. भगव्या रंगाच्या पताका, झेंडे, कमानी, प्रवेशद्वार, अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीचे कटआउट, विद्युत रोशणाईने शहर अक्षरश: रामरंगात आकंठ बुडाले आहे. सोशल मीडियावर सध्या रामभक्तीपर गाणी, व्हिडीओ, अयोध्येतील श्यामलराम मूर्तीची वैशिष्ट्ये, कारसेवकांचा संघर्ष, गेल्या ५०० वर्षांची प्रतीक्षा मांडणाऱ्या पोस्टची देवाणघेवाण सुरू आहे. प्रत्येकाच्या मुखी केवळ अन् केवळ प्रभू रामाचेच नाव आहे. खऱ्या अर्थाने ‘रामेंविण स्थळ रितेंचि ते नाही, वर्ते सर्वांठायीं राम माझा’, असे वातावरण सर्वत्र आहे. या वातावरणाच्या अनुषंगाने आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

घराजवळील मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन

अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा आपापल्या घरी बसून टीव्हीवर न पाहता घराजवळील मंदिरात होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, घराच्या दारावर तोरण, घरावर भगवा झेंडा आणि सायंकाळी किमान पाच दिवे प्रज्वलित करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद-बजरंग दलने केले आहे. शहरातील बहुतांश मंदिरांमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ वाजतादरम्यान धार्मिक अनुष्ठान ठेवण्यात आले आहेत. दुपारी १२.३८ वाजता अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान आरती होईल. त्याचवेळेला आज सर्व मंदिरांमध्ये, चौकाचौकात महाआरती होणार आहे. या आरतीमध्ये त्या-त्या परिसरातील कारसेवकांना आरतीचा मान देण्यात येणार आहे.

पोलिस सज्ज, ठिकठिकाणी नाकेबंदी

शहरातील कार्यक्रमांच्या अनुषंगाने पोलिसह सज्ज आहेत. रविवारी सायंकाळपासूनच ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. या सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. शहरात तब्बल साडेतीन हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. कार्यक्रमास्थळांवर पोलिसांची गस्त राहणार असून सीसीटीव्हीद्वारे प्रत्येक हालचालींवर पोलिस लक्ष ठेवतील. दरम्यान, सोमवारी पोलिसांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पोद्दारेश्वरला दीड लाख दिव्यांची आरास

ऐतिहासिक अशा पोद्दारेश्वर मंदिरात सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजतादरम्यान दीपदर्शन आणि दीपोत्सव होईल. यावेळी दीड लाख दिव्यांची आरास असेल. पांश्चजन्य शंख दलाद्वारे शंखनाद, शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाचे वादन, फटाका शो आणि रामायण तसेच राम मंदिर आंदोलनाशी जुळलेल्या व्यक्तींचा परिचय समालोचनाच्या रुपात सुरू राहणार आहे. तत्पूर्वी, सकाळी ८ ते १०.३० वाजतादरम्यान सुंदरकांडचे पठण, दुपारी १२ ते १ वाजतादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आणि महाआरती होईल.
वेध अयोध्येचे! एक कोटी कुटुंबांना आमंत्रण; विदर्भात ३० हजार ठिकाणी धार्मिक कार्यक्रम
साई मंदिरात किन्नरांच्या हस्ते पूजा

वर्धा मार्गावरील साई मंदिरात सकाळी ११ वाजता किन्नरांच्या हस्ते पूजा, आरती होणार आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या परिसरातून सकाळी ९ वाजतापासून रामधून रॅली निघतील. शहरातील ६ हजार ठिकाणी आज धार्मिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. संघाच्या नागपूर महानगरातील ३६२ वस्त्यांमध्ये ९१४ ठिकाणी आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महाआरती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामनगरातील राम मंदिरात दुपारी महाआरती करतील. तर लक्ष्मीभूवन चौकात सायंकाळी ६ वाजता त्यांच्या हस्ते रामज्योती प्रज्वलन सोहळा होणार आहे.

कोराडीला ६ हजार किलोचा ‘श्रीराम श‍िरा’

कोराडी येथील श्रीजगदंबा महालक्ष्मी देवस्‍थान येथे आज प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ६ हजार किलोचा ‘श्रीराम श‍िरा’ तयार करतील. हा एक विश्‍वविक्रम ठरणार असून तो विष्‍णू मनोहर श्री जगदंबा संस्‍थान कोराडीच्‍या नावे समर्पित करणार आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.