Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तलाठी भरती घोटाळ्यावरून काँग्रेस आक्रमक, दादर स्थानकात लोकल अडवली, रेल्वेचा खोळंबा

12

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या तलाठी भरती घोटाळ्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी दादर रेल्वे स्थानकात रुळांवर उतरत लोकल ट्रेन रोखून धरली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशी करून घोटाळ्यामागील मास्टरमाईंड शोधा, अशी प्रमुख मागणी करत कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी रूळांवर मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उतरल्याने पश्चिम रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना या आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या आंदोलनामुळे साधारण पुढील ४० ते ५० मिनिटे रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे.

राज्यात घेण्यात आलेल्या तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. मात्र त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना पुरावे देण्याची मागणी केली होती. गुणवत्ता यादी पाहिली तरी घोटाळ्याचा उघड उघड अंदाज लागतोय, यापेक्षा उपमुख्यमंत्री फडणवीसांना कोणते अधिक पुरावे हवेत? असं म्हणत विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. त्यातच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात आंदोलनही केले होते. तर आता युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईत रेल्वे रोको आंदोलन केलं.

यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोरिवली धीम्या लोकलची चैन खेचून आंदोलन सुरू केले. त्यानंतर आंदोलक रेल्वे पटरीवर उतरून घोषणा शिंदे – फडणवीस – पवार सरकारविरोधात घोषणा देत होते. तसेच तलाठी भरती घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली.

राज्यात तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे मागितले जात आहेत. एवढंच नाही तर आम्ही पुरावे दिल्यानंतरही कारवाई केली जात नाही. त्यामुळे आम्हाला रेल्वे रोको करून सरकारचं लक्ष वेधून घ्यावं लागल्याचे कुणाल राऊत यांनी सांगितले.

युवक काँग्रेसने तब्बल १८ मिनिटे बोरिवली लोकल रोखून धरली होती. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करायचे यासंदर्भात बैठक सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.