Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रोहित पवार यांची बारामती अॅग्रो कंपनी आणि त्यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या कन्नज साखर कारखान्याशी संबंधित चौकशी सुरू आहे. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या पथकांनी छापेमारी केली आहे. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली असून रोहित पवार यांनी २४ जानेवारीला चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यासंबंधी रोहित पवार यांनी म्हटले आहे, ईडीच्या कार्यालयात उद्या (बुधवारी २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय! माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या खासदार सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय, असेही पवार यांनी म्हटले आहे.
यापूर्वी एकदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव एका प्रकरणात आले होते. तेव्हा पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी जाण्याची तयारी केली. मोठा जमाव जमण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पुढे ईडीने पवार यांच्या चौकशीची गरज नसल्याचे व तशी कोणती प्रक्रिया नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर वातावरण निवळले होते. याचा राजकीय फायदा उठविण्याचा त्यावेळी राष्ट्रवादीकडून पुरेपूर प्रयत्न झाला होता. आजा रोहित पवार यांच्या चौकशीच्या निमित्तानेही त्या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे दिसून येते.