Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राम नव्हे, कामभरोसे मते मागा; उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना आव्हान, मुख्यमंत्री शिंदेंवरही हल्लाबोल
नाशिकमध्ये पक्षाच्या राज्य अधिवेशनानंतर मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत अनंत कान्हेरे मैदानावर भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला थेट आव्हानच दिले. ‘महाराष्ट्र संकटात होता, तेव्हा मोदी आले नाही. निवडणूक आली तेव्हा महाराष्ट्र आठवतोय. मणिपूरला लोकसभेच्या दोन जागा म्हणून तिकडे गेले नाहीत. इकडे ४८ जागा म्हणून येतात. महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक आपत्तीत निधी दिला नाही, पण गुजरातला न मागताही निधी दिला. हिंदूंमध्ये विष पेरतात. भेदभाव करतात. देशासाठी ‘मन की बात’ अन् गुजरातसाठी ‘धन की बात’ करता,’ अशा शब्दांत ठाकरे यांनी हल्लाबोल केला. मोदी देश आणि गुजरातमध्ये भिंत उभी करत आहेत. भाजपचे असलं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. माझ्याकडे कार्यकर्ते पळणारे नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांच्या घरी धाडी घालतात. घर कार्यकर्त्यांचे आणि त्यामध्ये हे अधिकारी तंगड्या पसरून बसतात. आमचे सरकार आल्यावर ह्याच तंगड्या गळ्यात घालणार असल्याचाही हल्लाबोल ठाकरे यांनी केला. भाजप म्हणजे ‘भेकड जनता पार्टी’ आहे. यंत्रणांचा वापर करतात, आमचे संरक्षण काढले. हे समोर माझे (शिवसैनिक) सुरक्षाकवच असल्याचे त्यांनी म्हटले.
ते शेपूट हलवत आहेत
ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. मिंधेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मिंधे तुझ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय आणि दिल्लीसमोर शेपूट हलवत चाकरी करतो, हेच शिवसेना प्रमुखाचे हिंदुत्व का?, अशा शब्दांत ठाकरे यांनी टीका केली. मला पक्षप्रमुख मानत नाही, मग २०१३ ला दाढी खाजवत माझा पाया का पडला? असा सवालही त्यांनी शिंदेंना केला.
भ्रष्टाचाऱ्यांना मान, पण शंकराचार्यांना नाही
सनातन धर्मावर कोणी बोललं की भाजपचे नेते आगपखाड करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील बाजारबुणगे शंकराचार्यांवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे आता भाजपात आज भ्रष्टाचाऱ्यांना मान, पण शंकराचार्यांना मान नाही असे म्हणावे लागेल, असा हल्लाबोलही केला.
योगीजी आता तुम्ही स्वतःला सांभाळा
भाजपची नीती बरोबर नाही. मित्रपक्ष आम्ही बरोबर होतो, असे असतानाही शिवसेना संपवण्याचे प्रयत्न करण्यात आले. तुम्हाला विरोधक, नको मित्रपक्ष नको, पक्षातील नेते नको. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग यांनाही मामा बनवले. देवेंद्र फडणवीस यांना फेकले, मिंधेंना फेकले, योगीजी आता तुम्ही स्वतःला सांभाळा. त्यांना जो जो प्रतिस्पर्धी वाटतो त्याला फेकतात, निवडणूक नंतर असे एखादे प्रकरण काढतील तेव्हा योगींनादेखील फेकतील, असे वक्तव्यही ठाकरे यांनी केले.
‘पुन्हा दार उघड’चा नारा
व्यासपीठावर तुळजा भवानीची प्रतिकृती उभारण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी सपत्नीक यावेळी व्यासपीठावरच जागरण गोंधळ घातला. हा गोंधळ (जागरण) आता आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घालायचा आहे. मी भवानीला साद घालतो, ‘दार उघड बये, दार उघड’. तुम्ही महाराष्ट्राची सत्ता द्याल ना, अशी भावनिक सादही ठाकरेंनी यावेळी घातली.