Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठा व खुल्या वर्गाचे आरक्षण सर्व्हेक्षण वादात सापडले; पहिली उत्तीर्ण बिगाऱ्याला मराठा सर्वेक्षणाचे काम

9

अहमदनगर : नगर शहरात महापालिकेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले मराठा व खुल्या वर्गाचे आरक्षण सर्व्हेक्षण वादात सापडले आहे. पहिली इयत्ताही पास नसलेले काही प्रगणक सर्व्हेक्षणात असून, त्यांच्याकडे अँड्राईड मोबाईल नसल्याने प्रश्नावली भरता येत नाही व इंग्रजीतून नावही टाईप करता येत नाही. यामुळे मनपा कामगार संघटना आक्रमक झाली असून, पहिली ते नववी शिकलेल्या मनपा कर्मचार्‍यांना या सर्व्हेक्षणातून वगळण्याची मागणी त्यांची आहे. याबाबत त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून सध्या राज्यात डिजिटल स्वरूपात सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, या कौशल्यपूर्ण कामासाठी नगर शहरात केवळ पहिली उत्तीर्ण असलेल्या बिगारी कर्मचाऱ्यालाही जुंपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अशा कर्मचाऱ्यांना बाजूला करून नवीन कर्मचारी नियुक्त केले जातील, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या राज्यभर हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. नगर शहरातील एका भागात सर्वेक्षणासाठी आलेल्या महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला मोबाईलमध्ये हे काम जमत नसल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. या कर्मचाऱ्याला वाचता तसेच स्मार्टफोन हाताळता येत नसल्याचे आढळून आले. त्यावर त्यांनी चौकशी केली असता संबंधित कर्मचारी महापालिकेच्या विद्युत विभागातील मदतनीस म्हणून काम करणारा आणि अल्पशिक्षित असल्याचे उघडकीस आले. खुद्द या कर्मचाऱ्यानेच याची कबुली देत आपण हे काम जमणार नसल्याचे सांगत असतानाही वरिष्ठांनी नियुक्ती केल्याचे सांगितले. महापालिकेने नियुक्त केलेल्या ८१६ कर्मचाऱ्यांमध्ये असे चतुर्थ श्रेणीतील आणखी काही कर्मचारी असल्याचे आढळून आले. त्यातील काही जण कुटुंबातील अन्य व्यक्तीला मदतनीस घेऊन काम करीत असल्याचेही आढळून आले.

हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचारी बदलण्यात येणार असल्याचे सांगितले. शाळेत महत्वाची कामे सुरू असल्याने शिक्षक उपलब्ध होत नाहीत. हे काम वेळेत पूर्ण करायचे असल्याचे महापालिकेकडे उपलब्ध असलेले कर्मचारी नियुक्त केल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

नगर शहरात दोन दिवसात सुमारे १० हजारापर्यंत घरांचे सर्व्हेक्षण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या सर्व्हेक्षणात मनपाचे काही बिगारी पदावर काम करणारे कर्मचारी प्रगणक असून, यापैकी अनेकांचे शिक्षण कमी आहे व त्यांना लिहिता-वाचताही येत नाही. त्यांच्याकडे आधुनिक मोबाईल नाही. त्यामुळे सर्व्हेक्षण अ‍ॅप डाऊनलोड करता येत नाही तसेच सर्व्हेक्षण करताना संबंधिताचे नाव इंग्रजीमधून त्या अ‍ॅपवर लिहावे लागत असल्याने व इंग्रजीचा गंधही नसल्याने अशा लोकांकडून सर्व्हेक्षण करणे म्हणजे त्या लोकांवर व सर्व्हेक्षणावरही अन्याय असल्याचे म्हणणे मनपा कामगार संघटनेचे आहे. त्यामुळे याबाबत मनपा आयुक्तांसह राज्य मागासवर्ग आयोग तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. पहिली पास असलेल्या कर्मचार्‍याने व्हीडीओद्वारे सर्व्हेक्षणातील त्याच्या अडचणी मांडल्या असून, तो व्हीडीओ व्हायरल झाल्याने मनपा अधिकार्‍यांनी त्याला कारवाईची धमकी दिल्याचा दावाही लोखंडे यांनी केला आहे.

सर्व्हेक्षणाच्या कामातून वगळण्याच्या मागणीसाठी मनपात सध्या कर्मचार्‍यांची गर्दी होत आहे. त्यामुळे आस्थापना विभागाने दरवाजावर प्रगणक म्हणून नेमलेल्यांनी ऑर्डर रद्द करण्यासाठी भेटू नये, अशी लेखी सूचना लावली आहे. शासकीय व जबाबदारीचे काम असल्याने नियुक्त केलेल्या प्रगणकांना ते करावे लागेल, असे आस्थापना विभागाद्वारे सांगितले जात आहे व नियुक्ती रद्द करण्यासाठी भेटू नये म्हणून दरवाजावर फलकही लावला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.