Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

समस्या ढिगभर, रुग्ण हतबल! सातपूरच्या ESI रुग्णालयात असुविधांचा विळखा, बाहेरुनच उपचार घेण्याचा सल्ला

6

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सातपूर येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाकडून मिळणाऱ्या आरोग्य सुविधांविषयी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे. या रुग्णालयात शंभरावर कर्मचारी कंत्राटी पदावरच काम करीत आहेत. येथे रुग्णांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, अशी तक्रारही रुग्ण करतात. येथे दाखल झाल्यानंतर खासगी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. या रुग्णालयाच्या काराभारावर उद्योजकदेखील नाखूष असून, त्यांनीही वारंवार तक्रारी केल्या आहेत. ‘इएसआय’कडे नाशिक जिल्ह्यातील सुमारे दीड ते दोन लाख कर्मचाऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. सातपूर-अंबड या परिसरातील कर्मचाऱ्यांसाठी हे एकमेव रुग्णालय असून, रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नसल्याचे दिसून येते.

कर्मचाऱ्यांची अरेरावी, रुग्ण हतबल

केस पेपर काढण्यासाठी गेल्यावर तासन् तास उभे रहावे लागते. खिडकी उघडण्याची वेळ झाल्यानंतरही नोंदणी करणारे कर्मचारी खिडकी उघडत नाहीत. त्यांना हव्या त्या वेळेला येतात, काही बोलायला गेल्यावर अरेरावी केली जाते. ‘तुम्हाला जे करायचे ते करा,’ अशी उत्तरे दिली जातात. रुग्ण हतबल असल्याने चूप बसतो. या ठिकाणी अनेकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

खासगी रुग्णालयांत जाण्याचा सल्ला

रुग्णालयाच्या दरवाजाजवळच खासगी डॉक्टरांची लिस्ट लावली असून, त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. लाखो नागरिकांना आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी या रुग्णालयावर आहे. मात्र सर्जन, पेडीएट्रिक, मेडिसीन, आर्थोपेडिक्स, स्त्रीरोगतज्ज्ञ यासारखी वर्ग एकच्या मंजूर पदांपैकी बहुतांश पदे रिक्त आहेत. कंत्राटी डॉक्टर अर्धवेळ जबाबदारी पार पाडत आहेत. हृदयरोग, अस्थिरोग, मेंदूरोग, बाळंतपण, मूत्रपिंड, क्रिटिकल केअर यांसारख्या शस्त्रक्रिया व उपचारांसाठी ‘इएसआय’शी संलग्न रुग्णालयांत रुग्ण पाठविण्यात येतात. त्याचबरोबर येथील कर्मचारी रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सरोज जवाते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही.

उघड्यावरच जाळला जातो कचरा

रुग्णालयाच्या आवारात कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित लावावी, असे आदेश असताना आवारात जमा होणारा कचरा उघड्यावर जाळला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य होत असून, त्याचा त्रास होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

‘आयसीयू’त कर्मचारीच नाहीत

रुग्णालयातील दहा खाटांच्या अतिदक्षता कक्षाला मान्यता देण्यात आली आहे. हे काम अर्धवट स्थितीत आहे. काम झाल्यानंतरही हा कक्ष लवकर सुरू होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी लागणारे प्रशिक्षित कर्मचारी रुग्णालयात उपलब्ध नाहीत, त्यामुळे नवीन कर्मचारी भरले, तरच हा कक्ष सुरू होईल. अन्यथा धूळखात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बाहेरून औषधे घेण्याचा सल्ला

येथे प्रिस्क्राईब करण्यात येणारी औषधे कधीही त्यांच्या फार्मसिस्टकडे उपलब्ध नसतात. अनेक रुग्णांना ही औषधे बाहेरून घेण्याचा सल्ला दिला देतो. त्यातील ठराविक औषधे ठराविक दुकानातच मिळतात. त्यामुळे दुकानदारांशी लागेबांधे असल्याची चर्चा रुग्णांमध्ये आहे.

परतावे मिळण्यास विलंब

अनेक कामगार रुग्णांना बाहेर जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो. बाहेर उपचार केल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्याचा परतावा तातडीने मिळणे अपेक्षित असते. मात्र मुंबई कार्यलयाकडून हेतुपुरस्सर काहीही तांत्रिक कारणे देऊन बिले अडवून ठेवली जातात. अनेकत रुग्णांची बिले एक-एक वर्षाने आली आहेत, असा आरोप रुग्णांनी केला आहे.
संवेदनाच सरणावर; चक्क मृतदेहावरील दागिन्यांची केली चोरी! नाशिक सिव्हिल रुग्णालयातील प्रकार
रोज सहाशे रुग्णांची ओपीडी

येथे रोज सकाळ-सायंकाळ बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. सकाळी अंदाजे तीनशे व सायंकाळी तीनशे अशा सहाशे रुग्णांची तपासणी केली जाते.

मंजूर पदे कायमस्वरूपी भरलेल्या जागा कंत्राटी रिकाम्या जागा
चतुर्थ श्रेणी कर्मचारी १५६ ४० ४२ ७४
तृतीय श्रेणी कर्मचारी ४२ २८ ९ ३७
औषधविक्रेते ४ १ ३ ०

कामगारमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्या समन्वयाच्या आभावाने राज्यातील सर्व रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. याबाबत केंद्रीय व राज्यस्तरावर अनेकांसी चर्चा केली. या रुग्णालयांमध्ये ५० टक्क्यांवर जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर तालुकास्तरावर रुग्णालये व्हावीत, अशी आमची मागणी आहे. याबाबत पंधरा दिवसांत सुधारणा न झाल्यास आम्ही आंदोलन छेडू.- डॉ. डी. एल कराड, कामगार नेते

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.