Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लातुर पोलिस अधिक्षक श्री सोमय मुंडे हे शौर्य पदकाने सन्मानित होणार…

9


लातुर पोलिस अधिक्षक श्री सोमय मुंडे हे शौर्य  पदकाने सन्मानित होणार…




नक्षलवाद्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेसाठी लातुर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना “शौर्य पदक” जाहीर…

लातुर(प्रतिनिधी) – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस पदकांची घोषणा करण्यात आली असून लातूर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना ‘शौर्य पदक’ मिळालं आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, 2021 मध्ये पोलिस अधीक्षक सोमय मुंडे हे गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना गडचिरोतील भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रांच्या कोपर्शी जंगलात छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमालगत जहाल सशस्त्र नक्षलवादी जमा झाले असून गस्त घालणाऱ्या पोलिस दलावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा गडचिरोली पोलिस दलाकडून विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्याची योजना तयार करण्यात आली. त्यामध्ये अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक आहेरी यांनी एकत्रित येऊन दिनांक 2 मार्च 2021 रोजी नक्षलवादी वास्तव्य करत असलेल्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविण्याची योजना तयार केली .त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 104 पोलीस अमलदार व अधिकाऱ्यांचे एकूण 8 विशेष पथके तयार करून प्राणहिता येथून 21 किलोमीटर पर्यंत पायी प्रवास करून नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान दिनांक 2 मार्च ते तीन मार्च पर्यंत पथकामधील कमांडोनी नक्षलविरोधी कोंबिंग ऑपरेशन राबविले. सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाला सुमारे 70 ते 80 सशस्त्र नक्षलवादी दिसले. त्यावेळी सोमय मुंडे यांनी यांच्या नेतृत्वातील पथकांची विभागणी करून पाच ते सहा किलोमीटर जंगलातून नक्षलवाद्यांचा पाठलाग केला. नक्षलवाद्यांचा गड असलेल्या महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर नारायणपूर जिल्ह्यातील अबुजमध भागात पोहोचल्यावर नक्षलवाद्यांनी अचानकपणे पोलिसावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वातील पथकाने प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यावर जोरदार गोळीबार केला. पोलिसांचा दबाव वाढल्याने नक्षलवादी तेथून पळून गेले. नक्षलवाद्यांनी अचानकपणे केलेल्या हल्ल्यामध्ये पथकामधील एक कमांडो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर प्रथमोपचार करून सोमय मुंडे यांचे नेतृत्वात पोलिसांनी नक्षलवादी थांबलेल्या परिसराची बारकाईने छाननी केली असता तेथे नक्षलवादी कॅम्प करून राहत असून ते त्यांच्या शस्त्रास्त्र निर्मितीचे युनिट चे ठिकाण असल्याचे आढळून आले. तेथे कच्चामाल आणि शस्त्र निर्मितीसाठी वापरले जाणारे मशीन्स, अर्धवट बनवलेले रायफल्स, ग्रॅनेट लॉन्चर, राऊंड, गन पावडर, सल्फर तसेच गावठी बॉम्ब बनविण्यासाठी वापरण्यात येणारे विविध वस्तू आढळून आले. तसेच सदर ठिकाणी स्वयंपाकाचे साहित्य,राशन, दैनंदिन वापराच्या वस्तू, नक्षली साहित्य इत्यादी आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले होते.
सदरची कारवाई पूर्ण करून कमांडो पथक पुढे जात असताना काही अंतरावर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर पुन्हा गोळीबार करण्यास सुरुवात केली तेथेही पोलिस पथकाने अतिशय जोरदार पणे प्रत्युत्तर देत गोळीबार केला. त्यावेळीही नक्षलवादी तेथून पळून गेले.
त्यानंतर पथक पुढे मार्गक्रमण करीत असताना अंधार झाल्याने व जखमी पोलीसावर तातडीने वैद्यकीय उपचार आवश्यक असल्याने सोमय मुंडे यांनी सॅटॅलाइट फोनवरून संपर्क साधून हेलिकॉप्टरने वैद्यकीय मदत मागून घेतली. दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाला चारी दिशेने घेरून पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी नक्षलवाद्याकडून जोरदार गोळीबार होऊनही पोलिस पथकाने त्यांच्या स्थानावरून एक इंच ही मागे न हटता नक्षलवाद्यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. यामध्ये विजय आणि संगीता नावाचे दोन नक्षलवादी ठार झाले व एक नक्षलवादी गंभीर जखमी झाला.
अबुजमाड परिसरातील कोपर्शी-फुलनार जंगलात तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वातील विशेष नक्षल विरोधी अभियान पथकाने सलग 24 तास लढा देऊन, मोठे अभियान राबवून घटनास्थळी तीन चकमकी होऊनही कसल्याही प्रकारची जीवित हानी होऊ न देता नक्षल कंपनी 10 आणि भामरागड दलम यांनी एकत्रितरित्या उभारलेला एक मोठा शस्त्रास्त्र कारखाना उध्वस्त केला व दोन नक्षलवादीना ठार केले.
पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी असामान्य शौर्य दाखवत गुणवत्तापूर्वक युद्धशैली चे अनुकरण करून नक्षलवाद्यांच्या गडामध्ये घुसून शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. तसेच तीन वेळा पोलिस पथक व नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक होऊनही कार्यक्षम नेतृत्व व धाडस दाखवत विशेष नक्षल विरोधी अभियानातील कोणत्याही पोलिस अधिकारी अमलदारांची जीवित हानी होऊ दिली नाही.
तत्कालीन पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केलेल्या अतिउत्कृष्ट कार्याबद्दल भारत सरकार तर्फे 2024 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कामगिरी बजावणा-याना पदके जाहीर करण्यात आली. यामध्‍ये नक्षलवाद्यांचा शस्त्राचा कारखाना उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेसाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांना “शौर्य पदक” जाहीर झाले आहे.





Leave A Reply

Your email address will not be published.