Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (१२१४०) २५ मे रोजी नागपूर-मुंबई सेवाग्राम एलएचबी डब्यांसह धावणार आहे. मुंबईहून सेवाग्रामचा परतीचा प्रवास (१२१३९) २६ मेपासून सुरू होणार आहे. सध्या ही गाडी आयसीएफ डब्यांसह धावत आहे. सेवाग्रामसाठी दोन २२ डब्यांची एलएचबी रेक धावत्या ठेवण्यात येणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन द्वितीय वातानुकूलित, १२ तृतीय इकॉनॉमी, ४ शयनयान, गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅनसह तीन द्वितीय श्रेणीचे डबे अशी २२ डब्यांची संरचना असणार आहे.
गाडी क्रमांक १७४१२ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर)-सीएसएमटी एक्स्प्रेस महालक्ष्मी एक्स्प्रेस नुकतीच एलएचबी डब्यांसह रवाना झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने एक्स्प्रेसला झेंडा दाखवत गाडी रवाना केली.
आयसीएफच्या तुलनेत एलएचबी डब्यांमधून रेल्वे प्रवास सुखद होतो. यामुळे टप्प्याटप्प्याने देशातील सर्व रेल्वेगाड्यांचे डबे एलएचबीमध्ये करण्यात येणार आहेत. सेवाग्राम आणि महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात आणि थांब्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एलएचबी म्हणजे काय ?
जर्मनीच्या लिंक-हॉफमैन-बुशने (एलएचबी) रेल्वे डबा विकसित केला आहे. कपूरथळा, चेन्नई आणि रायबरेली येथील रेल्वे कारखान्यात एलएचबी डब्यांची बांधणी केली जाते. आयसीएफ डब्यांच्या तुलनेत हलके, वेगाने धावण्याची क्षमता, कमी देखभाल खर्च, अपघातरोधक आणि उत्तम वातानुकूलित यंत्रणा ही एलएचबी डब्यांची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे देशातील सर्व रेल्वेगाड्यांतील आयसीएफ डबे मोडीत काढून त्याजागी एलएचबी डबे जोडण्याचा धोरणात्मक निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे.