Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गेल्या काही वर्षांत मुंबईतील वाहनांची संख्या चांगलीच वाढली असून, दिवसेंदिवस आणखी वाहने रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होणे, वाहतूककोंडी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. २०११-१२ मध्ये वाहनसंख्या २० लाख २८ हजार ५०० एवढी होती. ती संख्या आता ४३ लाखांहून अधिक झाली आहे. वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाहनांना पार्किंग मिळणे कठीण होत चालले आहे. रस्त्यांवर उपलब्ध असणारी पार्किंगची जागा मेट्रो, विविध विकासकामे आदी कारणांमुळे कमी होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिकेनेही पार्किंगच्या समस्येवर लक्ष देताना बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळांबरोबरच रस्त्यांवरील पार्किंगच्या सुविधेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबईतील २४ पैकी ११ वॉर्डमध्ये शुल्क आकारून पार्किंग सुविधा दिली जाते. याशिवाय मुंबईत पालिकेच्या १७ विभागांत ३२ ठिकाणी सार्वजनिक बहुमजली आणि भूमिगत पार्किंग उभारण्यात आले आहे. अन्य ठिकाणीही कामे सुरू आहेत. ६२ ठिकाणी रस्त्यांवर वाहनतळ आहे.
मुंबईतील काही भागात पार्किंग आणि नो पार्किंग क्षेत्रही आहे. सध्या वाहनांच्या एकूण संख्येच्या तुलनेत पार्किंगची उपलब्धता मात्र नाही. त्यामुळे नेमके पार्किंग कुठे करावे, असा प्रश्न वाहनचालकांना पडतो. यावर उपाय म्हणून पालिकेने, मोबाइलवर पार्किंगच्या जागांची उपलब्धता समजेल, अशी ॲप सेवा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारी, खासगी कार्यालयांच्या जागेबरोबरच निवासी सोसायट्यांच्या जागांमध्येही वाहनांना पार्किंग मिळेल की नाही, ते या ॲपद्वारे समजणार आहे. त्यानुसार जवळच उपलब्ध असलेल्या जागेत वाहनचालक आपले वाहन उभे करू शकेल. त्याचे दरही निश्चित केले जाणार आहेत. यातून पालिकेला आणि सोसायट्यांनाही उत्पन्न मिळणार आहे. यातील सॉफ्टवेअर कामासाठी निविदा काढण्यात आली असून त्यावर काम सुरू आहे. तर हार्डवेअरसह अन्य कामांसाठी लवकरच निविदा काढली जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. या निविदा मंजुरीसाठी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. पीपीपी मॉडेलवरच हा प्रकल्प राबविला जाणार आहे. पार्किंग सुविधा असलेल्या जागेवर सीसीटिव्ही आधारित सेन्सर बसवण्यात येणार असून ही कामे कंत्राटदार कंपनीकडूनच केली जाणार असल्याची माहिती वेलरासू यांनी दिली.
सॉफ्टवेअर कामासाठी निविदा
मंजुरीसाठी आयुक्तांकडे
पीपीपी मॉडेलवरच प्रकल्प
वाहनतळ प्राधिकरण प्रस्ताव
सध्या मुंबई महापालिकेकडून वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४मधील विशेष तरतुदी अंतर्गत ५१ नुसार प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. याच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडेही पाठवण्यात आल्याचे वेलरासू यांनी सांगितले. नवीन वाहनतळ निर्माण करणे, व्यवस्थापन आणि नवीन दर रचनेसह मुंबई वाहनतळ धोरणाची अंमलबजावणी, वाहनतळांकरिता माहितीपूर्ण चिन्हे बसवण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे इत्यादी कामे या प्राधिकरणामार्फत होतील.