Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वंदना द्विवेदी आणि ऋषभ निमग हे दोघेही लखनऊमध्ये राहणारे. कॉलेज जीवनापासून ते एकमेकांना चांगले ओळखायचे, त्यानंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झाले. मात्र, कॉलेज संपल्यानंतर वंदना हिने अभियांत्रिकी सॉफ्टवेअरचे शिक्षण पूर्ण केले तर ऋषभ हा लखनऊमध्येच काम करत होता. वंदना हिला पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये चांगल्या कंपनीत नोकरी लागली. त्यामुळे ती पुण्यात नोकरीसाठी दाखल झाली. तरी देखील वंदना आणि ऋषभ यांच्यातील नाते चांगले होते. दोघेही चांगले संपर्कात होते.
वंदना ही आयटी कंपनीत काम करत असल्याने तिला कामातून वेळ मिळत नसे. त्यामुळे ऋषभसोबत बोलणेही कमी होत असे. या सर्व गोष्टींचा विचार ऋषभने न करता त्याने ”वंदनाला पुण्याला गेल्यावर कुणी दुसरा तर भेटला नाही ना”, अशी संशयाची सुई त्याच्या मनात चुकचुकू लागली. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. जवळपास चार वर्ष त्यांच्यात भांडण होत होती.
अखेर ऋषभ हा २५ जानेवारी रोजी लखनऊवरून पुण्यात आला. त्याने हिंजवडी भागात एका हॉटेलमध्ये रुम देखील बुक केली. त्यानंतर त्याने वंदना हिला भेटण्यासाठी बोलावले. मात्र, ती कामात असल्याने ती २६ जानेवारी या दिवशी ऋषभ याला भेटायला गेली. त्याची भेट घेतली आणि ती पुन्हा रूमवर गेली, मुक्कामी थांबली नाही. या गोष्टीचा ऋषभला राग आला असावा. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ जानेवारी रोजी वंदनाला पुन्हा भेटण्यासाठी बोलावले. त्या दिवशी ते बाहेर फिरण्यासाठी गेले. शॉपिंग, जेवण, संपूर्ण वेळ एकमेकांसोबत घालवला.
संपूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवल्यानंतर ते पुन्हा ऋषभ राहत असलेल्या रूमवर आले. वंदनाला ऋषभच्या मनात काय सुरु आहे याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्याच्या मनात किती राग आहे हे त्याने देखील दाखवले नाही. घरी आल्यानंतर वंदना आतमध्ये गेल्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता तिच्या डोक्यात आणि अंगावर एका मागोमाग एक अशा पाच गोळ्या झाडल्या. सलग पाच गोळ्या लागल्याने वंदना ही रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. समोरचे दृश्य पाहून त्याला जराही पश्चात्ताप झाला नव्हता. अशी परिस्थिती त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. हा सर्व प्रकार केल्यानंतर त्याने चेहऱ्यावर कोणतेही हावभाव न आणता अगदी शांततेत तो घरातून बाहेर पडला आणि मुंबईच्या दिशेने निघून गेला. आजूबाजूच्या कुणालाही याबाबत काही माहीत नसल्याचे देखील समोर आलं आहे.
ऋषभ ज्यावेळी हिंजवडीतून नवी मुंबईत पोहोचला. त्यावेळी मुंबई पोलीस नाकाबंदी करत होते. त्यामुळे प्रत्येकाची तपासणी केली जात होती. पोलीस ऋषभपर्यंत पोहोचले. त्याच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याची चेकिंग सुरु केली. चेकिंग करत असताना पोलिसांना त्याच्याकडे पिस्तूल सापडली. पिस्तुल कुठून आली असा प्रश्न पोलिसांनी विचारताच त्याचा चेहरा कावराबावरा झाला. तिथेच त्याचे पितळ उघडे पडले. पोलिसांनी त्यांच्या खाक्या दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला.
प्रेमात एकामेकावर विश्वास असणे अत्यंत गरजेचं आहे. त्यात एकमेकांना समजून घेणं देखील तितकच महत्त्वाचं आहे. मात्र, नात्यात संशय आला तर असे टोकाचे निर्णय घेतले जातात आणि आयुष्य उध्दवस्त केले जाते. हेच या हिंजवडी मर्डर प्रकरणावरून समोर येत आहे. ऋषभच्या संशयी स्वभावामुळे अनेक वर्षांपासून असणाऱ्या प्रेमाच्या नात्याचा अत्यंत वाईट शेवट झाला.