Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईवर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, नवी मुंबई येथे आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून अधिसूचनेची प्रत हाती दिल्यानंतर हा मोर्चा मुंबईकडे न जाता आंदोलनही स्थगित केल्याचे जाहीर करण्यात आले. अधिसूचनेत सगेसोयरे यांची व्याख्या करत कुणबी नोंदी सापडलेल्या सर्व मराठ्यांनाही कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट करण्यात आले. ओबीसी नेत्यांच्या म्हणण्यानुसार गाव पातळीवर सर्वेक्षणात मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी समोर आलेली तथ्ये लपविण्याचा अटोकाट प्रयत्न होत आहे. हे थेट गोरगरीब ओबीसी समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे. त्यामुळे ओबीसी समाजात प्रचंड असंतोष धुमसत आहे. ओबीसी समाजाची प्रतिक्रिया संपूर्ण शक्तीनिशी राज्यात उमटणार यात शंका नाही, असे ओबीसींच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘मटा’शी बोलताना सांगितले.
अधिसूचनेचा मसुदा जाहीर झाल्यानंतर ओबीसी समाजातील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया आली होती. रविवारी छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या ओबीसी समाजातील नेत्यांकडून याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. चर्चेअंती १ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात सर्व आमदार, खासदार आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलने करण्याचे ठरविण्यात आले. ३ फेब्रुवारीला अहमदनगर येथे जाहीर सभा घेण्याचेही निश्चित करण्यात आले.
ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाला घेऊन छोट्या समाजांना ओबीसी आरक्षणाच्या बाहेर ढकलण्याचे काम सुरू आहे, अशी खंत छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. संपूर्ण राज्यातील ओबीसींमध्ये प्रचंड खदखद असून या असंतोषाला वेळीच शमवले नाही तर त्याचा उद्रेक होऊ शकतो. सरकारच्या अधिसूचनेविषयी लाखोंच्या संख्येने हरकती नोंदविण्यात येणार आहेत. घटनात्मक मार्गाने हा असंतोष आम्ही कागदावर मांडणार आहोत, असेही ते म्हणाले.
मराठवाड्यातून सुरुवात
समाजातील हा रोष सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी विराट मोर्चा काढण्याची मागणी सर्व ओबीसी नेते करत आहेत. १६ फेब्रुवारीनंतरची तारीख याकरिता नक्की केली की, हा मोर्चा मराठवाड्यातून सुरू होऊन तो मुंबईकडे कूच करेल. या मोर्चाच्या नियोजनासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. या मोर्चाची सुरुवात बीडमधून होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.