Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
गेली तीन ते चार वर्षे सततचा पाऊस, अतिवृष्टीचा फटका मराठवाड्यास बसला. यंदा मात्र सर्वदूर पुरेसा पाऊस झाला नाही. परिणामी, खरीप पिकांना त्याचा फटका बसला. पाण्याअभावी रब्बी पिकांनादेखील फटका सहन करावा लागत आहे. मध्यंतरी काही मंडळात अतिवृष्टी झाली; पण त्याचा फारसा फायदा प्रकल्पातील जलसाठा वाढीसाठी झाला नाही. उलट रब्बी पिकांसह फळबागाचे मात्र नुकसान झाले. दुसरीकडे पाण्याअभावी तहानलेल्या गावाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र आहे.
तीन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांतील १०४ गावे आणि २५ वाड्यांना १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यात गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यातूनही टँकरची मागणी झाली असून, पाणी टंचाईच्या झळा यंदा अधिक असणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११७ गावे व १४ वाड्याना १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालन्यातील ५८ गावे आणि २५ वाड्यांना ११० टँकरद्वारे तर बीड जिल्ह्यातील एक गाव आणि तीन वाड्यांना एका टँकरद्वारे असे या तिन्ही जिल्ह्यांत मिळून तहानलेल्या एकूण १७६ गावे ४२ वाड्यांना २५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. यात केवळ एका शासकीय टँकरचा समावेश असून पाणी पुरवठा करणारे उर्वरित टँकर हे खासगी आहेत.
मराठवाड्यातील अन्य जिल्हे तूर्तास तरी टँकरमुक्त आहेत. परंतु, दिवसेंदिवस तहानलेल्या गावांच्या संख्येत होणारी वाढ, तर दुसरीकडे प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी घट पाहता यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यात ३३७ विहिरींचे अधिग्रहण
२८ जानेवारीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील ३३७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८६, जालना १०२, परभणी ५२, नांदेड २, बीड १४ आणि धाराशीव जिल्ह्यात ५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी ११४ गावांतील १२८ विहिरीचे तर टँकर व्यतिरिक्त १६६ गावातील २०९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
असा आहे टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
गावे : ११७
वाड्या : १४
टँकर : १४४
.
जालना
गावे : ५८
वाड्या : २५
टँकर : ११०
.
बीड
गाव : १
वाड्या : ३
टँकर : १
–
अधिग्रहित केलेल्या विहिरी
जिल्हा
छत्रपती संभाजीनगर ८६
जालना १०२
परभणी ५२
नांदेड २
बीड १४
धाराशीव ५५