Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महापालिका व महावितरण यांच्यातील पाणी वीज बिलाचे वाद २५ ते ३० वर्षांपासूनचे आहेत. जुनी वादग्रस्त असलेली वीजबिलाची थकबाकी तब्बल ३३० कोटी रुपयांची आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने किमान चालू वीज बिल भरण्याची तडजोड झाली आहे. मात्र, हे पैसेही मनपा नियमित भरत नसल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. मनपाने मुळा धरणातून नगर शहरापर्यंत पाणी आणण्यासाठी तीन ठिकाणी उपसा करावा लागत असल्याने मुळा धरण, विळद जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर उपकेंद्रासाठी वीज कनेक्शन घेतले आहे. या तिन्ही वीज कनेक्शनचे मिळून महिन्याला वीज बिल सरासरी २ कोटी ८० लाखापर्यंत येते. हे पैसे वेळच्यावेळी महापालिकेकडून भरले जात नसल्याने महावितरणकडून पाणी योजनेची वीज तोडण्याचा इशारा दिला जातो. मध्यंतरी अशी वीज काही तासांसाठी बंद केली गेली होती.
त्यानंतर महापालिकेने टप्प्या टप्प्याने पैसे देत डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत सुमारे ३ कोटी महावितरणकडे जमा केले. मात्र, जानेवारी २०२४ ची चालू बिलाची सुमारे २ कोटी ९० लाखाची थकबाकी तातडीने भरावी, असा तगादा महावितरणने लावला होता. मनपाकडे पुरेसे पैसे नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. पण पैसे आले नसल्याने बुधवारी (३१ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता मुळा धरण येथील मुख्य वीज कनेक्शनची वीज महावितरणने तोडली.
बुधवारी सायंकाळी वीज तोडल्यानंतर धरणातून पाणी उपसा बंद झाला आहे. मात्र, बुधवारी सायंकाळी सावेडीच्या व नगर शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. पण, सायंकाळी ७ नंतर पाणी पुरवठा सुरू असलेल्या सर्व उपनगरांचा पाणी पुरवठा बंद झाला आहे. गुरुवारी मात्र कोठेच पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सावेडीची उंच टाकी असलेल्या भागातील गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हडको व तारकपूर परिसर तसेच पाईपलाईन रोड परिसरातील काही भागात पाणी आले नाही. तसेच मध्य नगर शहरातील कोठी, झेंडीगेट, रामचंद्रखुंट, मंगलगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर सह सर्व उपनगरांच्या भागात पाणी आले नाही.
मनपाने पैसे भरल्यावर महावितरणकडून मुळानगर येथील मुख्य कनेक्शनची वीज पुन्हा जोडली जाईल, पण यासाठी कधी मुहूर्त लाभेल, हे गुलदस्त्यात आहे. मात्र, पाणी येणार नसल्याने शहरात पाण्याची बोंबाबोंब होणार आहे. वीज पुरवठा पुन्हा सुरू झाला तरी पाण्याच्या अवाढव्य पाईपलाईनमधील पाणी व हवेचा दाब नियंत्रित करीत हळूहळू उपसा क्षमता वाढवावी लागणार असल्याने पुढचे किमान तीन दिवस तरी शहराचा पाणीपुरवठा विस्कळित राहणार आहे.