Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- भंडारदरा धरण रविवारी शंभर टक्के भरले
- नदी पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात
- नदी काठच्या गावांना आणि पर्यटकांना प्रशासनाकडून दक्षतेच्या सूचना
बुधवारपासून भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी या भागात पावसाचा जोर वाढला होता. भंडारदरा धरणावर मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. सध्या मात्र करोनामुळे त्यांची संख्या तुलनेत कमी आहे. रविवारी धरण परिसरात गर्दी होती. सकाळी ११ च्या सुमारास धरणावर उपस्थित असलेले पर्यटक धरण भरल्याच्या क्षणाचे साक्षीदार ठरले. धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असून आल्हाददायक वातावरण आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने नदी काठच्या गावांना आणि पर्यटकांना प्रशासनाने दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.
धरण भरल्यानंतर स्पिल्वेचे गेट उघडून २४३६ व वीज केंद्रातून ८३० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे यांनी सपत्नीक जलपूजन करून जलाशयाला साडी चोळी श्रीफळ अर्पण केली. सरपंच दिलीप भांगरे, वकील अनिल आरोटे उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या पर्यटकांनी आनंद व्यक्त केला. धरण भरतानाच्या क्षणाचे साक्षीदार झाल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले. परिसरात पाऊस सुरू आहे. या पावसातही भरलेल्या धरणाचे दृष्य आणि धबधबे डोळ्यात साठवण्यासाठी पर्यटकांची धावपळ सुरू होती. धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने दोन्ही वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाले. वाकी जलाशयातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णवंती नदीला पूर आला आहे. त्यामुळे रंधा धबधबा अवतीर्ण झाला आहे.
निळवंडे जलाशय लवकरच भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला. जलपूजन करताना अशोक भांगरे यांनी समाधान व्यक्त करून करोनामुळे तालुक्यातील जनता हैराण झाली आहे. पर्यटन पूर्ववत झाल्यास येथील व्यवसायिकांना पर्यटक वाढल्याने रोजगार मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.