Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- काँग्रेसच्या नेत्यानेही केली हसन मुश्रीफ यांची पाठराखण
- भाजपवर केली घणाघाती टीका
- महाविकास आघाडीतील नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं असल्याचा आरोप
पालकमंत्री पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, राजकारणामध्ये प्रत्येक पक्षाने सत्तेचं स्वप्न पाहणं, हे क्रमप्राप्त आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यापूर्वी भाजपनेही सत्तेत येण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गानी केला. आता साधारणपणे दोन वर्षांचा काळ गेल्यानंतर महाराष्ट्रासारख्या प्रगतशील आणि सक्षम राज्याची सत्ता आपल्याकडे नाही, याचे शल्य त्यांना आहे. त्यातूनच महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध मार्गाने टार्गेट केलं जात आहे.
‘लोकशाहीमध्ये महाराष्ट्रातील लोकांनी जो निर्णय दिलेला आहे, त्याला अनुसरून आमदारांनी आणि तीन राजकीय पक्षांनी निर्णय घेतला आणि सत्ता स्थापन केली . राजकारणात ही गोष्ट मनाचा मोठेपणा दाखवून विरोधकांनी मान्य करायला हवी, असं मला वाटते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बाबतीत जे काही घडत आहे, ते दुर्दैवी आहे,’ असंही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रासाठी अशोभनीय गोष्ट’
‘सामान्य माणसाशी नाळ जुळलेल्या त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गेली ४० वर्ष राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाचा वसा घेतला आहे. सामान्य माणसासाठी त्यांच्या घराचा दरवाजा भल्या पहाटेपासून उघडा असतो. पण त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मन निश्चितपणे व्यथित होऊ शकते. निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, परंतु निवडणूक झाल्यानंतर एकदा जनतेने निर्णय दिल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या व्यक्तिगत मागे लागणे, हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे,’ अशा शब्दांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
‘आम्ही कणखरपणे मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे आहोत’
‘मुश्रीफ यांच्याबाबत अशा सगळ्या प्रकरणांमध्ये यापूर्वीच अनेक चौकशा झालेल्या आहेत. त्यांची इन्कम टॅक्सची चौकशी तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर झाली आहे. या सगळ्या चौकशीचे निरसन ज्या-त्यावेळी झालेलं आहे. ही माहिती नियमानुसार वेबसाईटवर उपलब्ध आहे. अशा वेळी पुन्हा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. मंत्री मुश्रीफ या सर्व आरोपातून निश्चितपणे बाहेर पडतील, असा आम्हाला विश्वास आहे. सर्वसामान्य जनतेचा नेता असलेल्या मुश्रीफ यांच्या पाठीशी या काळामध्ये आम्ही कणखरपणे उभे आहोत,’ असंही या पत्रकात पालकमंत्री पाटील यांनी म्हटलं आहे.