Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- लॉकडाऊनमध्ये आईने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचं लावलं लग्न
- लग्नानंतर मुलीच्या वाट्याला छळ
- अखेर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
नेवासा तालुक्यातील एका बालिकेच्या वाट्याला हा संघर्ष आला. तिच्या वडीलांचे निधन झालं आहे. तिची आई व आजोबा घरी असतात. आई मोलमजुरी करून घर चालवते. ही मुलगी नेवासा फाटा येथील एका शाळेत पाचवीत शिकत होती. लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्या. त्यामुळे तिची आई आणि मावशी यांनी तिचे लग्न मे २०२१ मध्ये माळी चिंचोरा येथील संदीप शेखर जाधव याच्याशी लावून दिले. ही गोष्ट त्यांनी मुलीचे आजोबा काकासाहेब मोहनीराज भांगे यांच्यापासून लपवून ठेवली होती.
लग्नानंतरही पुढे वेगळ्याच संकटांची मालिका सुरू झाली. तिचा सासरी छळ सुरू झाला. घरकाम येत नाही, स्वयंपाक येत नाही वगैरे कारणांवरून छळ सुरू झाला. त्यावर ती म्हणायची मला घरी नेऊन सोडा. त्यावर सासरच्या मंडळींनी कहरच केला. ती सासरी नांदत नाही म्हणून उपचार करण्यासाठी मांजरी (ता. राहुरी) येथील मांत्रिकाकडे घेऊन गेले. तेथेही समाधान झाले नाही म्हणून खरवंडी (ता. नेवासा) येथे दुसऱ्या मांत्रिकाकडे घेऊन गेले. मांत्रिकाने तिला मारहाण केली. हा छळ सहन होत नसल्याने अखेर पाच सप्टेंबर २०२१ ला तिला तिच्या आईच्या घरी आणून सोडण्यात आले.
काही दिवसांनी तिने आपल्या आजोबांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. आजोबांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे, बाबा अरगडे, बी. के. चव्हाण, अर्जुन हरेल, देविदास कराळे यांना भेटून मदतीची विनंती केली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. त्यामुळे अंनिसच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुलगी व अजोबा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला खरा पण त्यात मुलीलाच फिर्याद करण्यात आले आहे. तांत्रिक दृष्टया ही चूक असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी मुलीची आई, मावशी, तिचा पती, सासरची मंडळी आणि तांत्रिक-मांत्रिक अशा नऊ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालकांचे लौंगिक शोषण प्रतिबंधक कायदा, जादूटोणा विरोधी कायदा अशा विविध कायद्यातींल कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना दत्तु गवारे, दत्तात्रय विष्णु गवारे, मीना सुनील शिंदे, संदीप शेखर जाधव, शेखर दगडू जाधव, छबूबाई शेखर जाधव मांजरी व खरवंडी येथील अनोळखी मांत्रिक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘अहमदनगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात बालविवाहाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांना आळा घालण्यास प्रशासनाला अपयश येत आहेत. संघटनांच्या मदतीने त्या उघड झाल्या तरीही कारवाई करण्यास प्रचंड दिरंगाई केल्यामुळे अशा घटना वाढतच असल्याचं चित्र आहे,’ अशी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अॅड. रंजना गवांदे यांनी दिली आहे.