Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्कचा ताबा अखेर डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपने सोडला
- महापालिकेतील राजकीय वादातून कराराला मुदतवाढ न देण्याची विनंती
- सतत आरोप होत असल्याने प्रकल्प ठरला होता वादग्रस्त
रमणमळा येथे असलेल्या तलावाचे सुशोभिकरण करून तेथे वॉटरपार्क उभा करण्याचा करार महापालिका आणि डॉ.डी. वाय. पाटील ग्रुपच्या ज्ञानशांती अॅण्ड कंपनीमध्ये झाला होता. २० वर्षाचा हा भाडे करार होता. पण २० वर्षानंतर आणखी नऊ वर्ष करार वाढवण्याची तरतूद या करारात करण्यात आली होती. १५ मे २००१ रोजी हा करार झाला होता. वीस वर्षाची मुदत १३ मे २०२१ रोजी संपली. करारानुसार आणखी नऊ वर्षे मुदतवाढ मागण्याची तरतूद होती. त्यामुळे आणखी नऊ वर्षे हा प्रकल्प ज्ञानशांती ग्रुपच्या ताब्यात राहिला असता. पण गेल्या काही वर्षात या प्रकल्पाबाबत सतत आरोप होत असल्याने तो वादग्रस्त ठरला होता. त्या वादाचा फटका मात्र या प्रकल्पाला बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
डॉ. डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी हा प्रकल्प ताब्यात घेतल्यानंतर त्याचे अतिशय चांगले सुशोभिकरण केले. त्यासाठी मोठी रक्कम खर्च केली. तलावाचे रूपच पालटले. कोल्हापूरच्या सौंदर्यात यामुळे भर पडली. राज्याच्या विविध भागातून या वॉटरपार्कमध्ये पर्यटनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. लग्नापासून ते विविध कार्यक्रमासाठी त्याचा वापर सुरू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील सौंदर्यपूर्ण वास्तू म्हणून त्याची ओळख निर्माण झाली.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात काही वर्षापूर्वी संघर्ष सुरू झाला. या संघर्षातून एकमेकांच्या संस्था व प्रकल्पावर आरोप सुरू झाले. यातूनच माजी महापौर सुनील कदम व सत्यजीत कदम यांनी वॉटरपार्कच्या घरफाळ्याचा मुद्दा पुढे आणला. या जागेचा घरफाळा भरला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने घरफाळा आम्ही भरण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपने घेतली. तसा अनेकदा खुलासा केला.
महापालिकेशी झालेल्या करारानुसार घरफाळा कंपनीने भरण्याबाबत उल्लेख नसल्याने घरफाळा भरण्यासाठी नोटीस काढण्याची विरोधकांची मागणी महापालिकेने मान्य केली नाही. तरीही कोणतीही निवडणूक आली की घरफाळ्याचा विषय सतत ऐरणीवर आणण्यात येऊ लागला. शेवटी या वादाचे पडसाद म्हणून वॉटरपार्कचा करार पुढे न वाढवण्याचा निर्णय ज्ञानशांती ग्रुपने घेतला आहे. तसे पत्र कंपनीने महापालिकेस दिले आहे. आपला २० वर्षाचा करार संपला असून मुदतवाढीची कंपनीची कोणतीही इच्छा नाही, त्यामुळे जागा ताब्यात घेण्याची तजबीज करावी अशी विनंती एका पत्राव्दारे महापालिकेस करण्यात आली आहे. यामुळे वॉटरपार्क बाबतचा करार संपुष्टात येणार असल्याने हा प्रकल्प आता बंद पडण्याचीच चिन्हे अधिक आहेत. याचा फटका मात्र कोल्हापूरच्या पर्यटनाबरोबरच महापालिकेसही बसणार आहे. तो प्रकल्प चालू रहावा यासाठी आरोप करणाऱ्यांनीच त्याचा ठेका घेऊन तो चालवून दाखवावा असं आव्हानच देण्यात आलं आहे.
‘महापालिकेबरोबर केलेल्या कराराचे सर्व नियम पाळून वॉटरपार्क चालवण्यात येत होते. कोल्हापूरच्या सौंदर्यात भर टाकलेल्या या प्रकल्पाबाबत माजी नगरसेवक सुनील कदम आणि सत्यजीत कदम यांनी सतत खोटे आरोप करत बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरसाठी चांगलं काही तरी करण्याची इच्छा असूनही सततच्या खोट्या आणि निराधार आरोपामुळे मन विशन्न होते. त्यामुळे या कराराला मुदतवाढ घेण्यास आम्ही नकार दिला आहे. सतत विरोध करणाऱ्यांनी त्याचा ठेका घेऊन तो चांगला चालवून दाखवावा,’ असं आव्हान डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी दिलं आहे.