Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दिल्लीच्या मंत्री आतिषी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवला. ‘एका खोट्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. त्यानंतर दिल्लीत सरकारी बैठकांना येणे अधिकाऱ्यांनी बंद केले आहे. केजरीवाल यांचे सरकार पाडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारस्थान भाजपकडून सुरू असल्याचे या सर्व गोष्टींवरून दिसून येते’, असा आरोप आतिषी यांनी केला.
आतिषी म्हणाल्या, ‘दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करणे बेकायदा, घटनाबाह्य आणि दिल्लीच्या मतदारांच्या आदेशाच्या विरोधात असेल. दिल्लीच्या नागरिकांनी अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला स्पष्ट जनादेश दिला आहे. तो धुडकावला, तर दिल्लीकरांचा भाजप सरकारच्या विरोधातील जनआक्रोश प्रचंड प्रमाणात बाहेर येईल. भाजपने कितीही प्रयत्न केले, तरी ते दिल्लीत अरविंद केजरीवाल यांना पराभूत करू शकत नाहीत, हे त्यांना माहिती आहे.’
गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारमध्ये एकही अधिकारी तैनात नाही, असे सांगून आतिषी म्हणाल्या, ‘दिल्लीतील अनेक विभाग रिक्त आहेत. नायब राज्यपाल मागील आठवडाभरापासून कोणतेही कारण नसताना दिल्ली सरकारविरोधात गृहमंत्रालयाला पत्रांमागून पत्रे लिहित आहेत. या सगळ्यावरून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा भाजपचा डाव असल्याचे स्पष्ट दिसून येते.’
‘ही तर बेताल वक्तव्ये’
आतिषी यांचे आरोप म्हणजे आपचे नेते बेताल वक्तव्ये करू लागल्याचे लक्षण आहे, असे टीकास्त्र भाजप खासदार मनोज तिवारी यांनी सोडले. ‘येथील सत्ता हडपणाऱ्यांना तुरुंगातून सरकार चालवायचे आहे. प्रशासकीय रचनेत तुरुंगातून सरकार चालवणे शक्य नाही. पण त्यांना दिल्लीची चिंता नाही. त्यांना केवळ वैयक्तिक फायद्यासाठी खुर्चीला चिकटून राहायचे आहे. त्यामुळे दिल्लीच्या कामात अडथळे येत आहेत. मग दिल्लीच्या समस्या कोण सोडवणार? कायदा आपले काम करत आहे. सनसनाटी पसरवण्यासाठी ‘आप’चे नेते, मंत्री असेच खोटे बोलत राहिले, तर भविष्यात खोटेच त्यांच्या नशिबाला येईल’, असेही तिवारी म्हणाले.