Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dhananjay Munde: ऋणातून उतराई होण्याची आपली बारी!; ‘तो’ शासन निर्णय जारी होताच मुंडे म्हणाले…

14

हायलाइट्स:

  • राज्यातील ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र.
  • ऊसतोड कामगार नोंदणीचा शासन निर्णय जारी.
  • विविध कल्याणकारी योजनांचा आता थेट लाभ मिळणार.

मुंबई: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय बुधवारी निर्गमित करण्यात आला आहे. कुठल्याही दस्त ऐवजात ‘ऊसतोड कामगार’ अशी नोंदणी नसलेल्या लाखो असंघटित ऊसतोड कामगारांना यामुळे खूप मोठा दिलासा मिळणार आहे. ( Dhananjay Munde On Sugarcane Workers )

वाचा: ओबीसी आरक्षणावर मोठं पाऊल; मंत्रिमंडळाने घेतले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

याबाबतचा शासन निर्णय व सोबतच नोंदणी करावयाचा नमुना फॉर्म व ओळखपत्राचा नमुना देखील निर्गमित करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात ग्रामसेवकामार्फत ही नोंदणी पूर्ण केली जाणार आहे. सदर नोंदणी यावर्षीच्या हंगामाला कामगार स्थलांतरीत होण्यापूर्वीच केली जावी; नोंदणी करताना स्थानिक राजकारण, गाव स्तरावरील गटबाजी किंवा पक्षपात अशा कोणत्याही बाबीचा परिणाम नोंदणीवर न होऊ देता पारदर्शक पद्धतीने सरसकट ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र दिले जावे, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत.

वाचा: CM ठाकरे-अमित शहा यांची दिल्लीत होणार भेट!; तर्कवितर्कांना उधाण

ऊसतोड कामगारांचे नाव, आधार कार्ड, फोटो, बँक खाते, रेशन कार्ड यांसारख्या काही कागदपत्रांची या नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यकता भासणार आहे. तसेच ज्या ऊसतोड कामगारांनी अलीकडच्या काळात ऊसतोडणीचे काम बंद केले मात्र पूर्वी ते ऊसतोडणी करत होते, अशा कामगारांचीही नोंदणी याद्वारे करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. महामंडळांतर्गत संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना, आरोग्य विमा या व यांसारख्या अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगार नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. यासाठी संकलित केलेली माहिती संपूर्ण संगणकीकृत करून एका अॅपद्वारे नोंदणी व ओळखपत्र प्रक्रिया आणखी सुलभ करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगार बांधवांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत ग्रामसेवकांकडे जमा करून आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन मुंडे यांनी केले.

वाचा: पोलीस शिपाई भरती: राज्य सरकारचा ‘त्या’ उमेदवारांसाठी मोठा निर्णय

पिढ्यानपिढ्या ऊसाच्या बुडावर कोयत्याने घाव घालून अनेक हाल-अपेष्टा सोसलेल्या ऊसतोड कामगारांच्या हातांनी स्वतःची व आपल्या मुला-बाळांची उपेक्षा सहन करत आपली साखर गोड केली. आता या कष्टकरी हातांच्या ऋणातून उतराई होण्याची आपली बारी आहे, त्यासाठी कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची पारदर्शक पद्धतीने नोंदणी होणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याच्या भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच जिल्हा स्तरावरून यासंबंधीचे अनुषंगिक आदेश ग्रामसेवकांना देण्यात यावेत व निर्धारित वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी संबंधितांना केल्या आहेत.

वाचा: किरीट सोमय्यांवरील कारवाई नक्की कुणाच्या आदेशाने?; वळसे म्हणाले…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.