Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘नवे संसद भवन उभारल्याने लोकशाही वाढेल असे कुणाला वाटत असेल तर…’

15

हायलाइट्स:

  • शिवसेनेचा मोदी सरकारवर गंभीर आरोप
  • मोदी सरकारकडून राष्ट्रीय एकतेस चूड लावण्याचा प्रयत्न
  • राज्यपाल कोश्यारींनाही केले लक्ष्य

मुंबई: ‘राज्यपालांनी घटनाकारांनी नेमून दिलेल्या कर्तव्यांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र काही राज्यांचे राज्यपाल राजभवनात बसून त्यांनीच शपथ दिलेले सरकार अस्थिर करण्यासाठी बळ लावताहेत. राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका,’ असा इशारा शिवसेनेने दिला आहे. (Shiv Sena attacks Modi Government in Saamana Editorial)

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत उत्तर दिले आहे. काँग्रेसनेही मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत भाजपशासित राज्यांतील महिला अत्याचाराची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून महाराष्ट्राच्या राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

वाचा: शिर्डीत खळबळ! साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

‘राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारे ज्या राज्यांमध्ये नाहीत, त्या राज्यांत ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच ‘रोल’ अदा करतात व अशा हत्तींचे माहुत दिल्लीत बसून नियंत्रण करीत असतात. त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात. महाराष्ट्रात हेच सुरू आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ‘राज्यांना धडपणे काम करू द्यायचे नाही. राज्यातील आपल्या हस्तकांना संरक्षण देऊन त्यांना हवा तसा गोंधळ घालू द्यायची मुभा द्यायची. राज्यपालांसारख्या घटनात्मक संस्थांचे त्यासाठी अवमूल्यन करायचे. यामुळे देशाची संघराज्य व्यवस्थाच कोलमडून पडत आहे. दिल्लीत नवे संसद भवन उभारल्याने लोकशाही टिकेल व वाढेल असे कुणाला वाटत असेल तर त्यांच्या पायाखाली चिरडलेल्या संघराज्य व्यवस्थेच्या किंकाळ्याही त्यांनी जरा ऐकायला हव्यात,’ असा खोचक सल्ला शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला आहे.

‘सध्या कावळे मोती खात आहेत व हंस दाणे टिपत आहेत. महाराष्ट्रासह देशातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत एकंदरीत घडामोडी पाहता तेच म्हणावे लागेल. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महंत नरेंद्र गिरी महाराजांवर आत्महत्या करण्याची वेळ आली. या विषयावर उत्तर प्रदेश विधानसभेचे खास दोन-चार दिवसांचे अधिवेशन बोलावून चर्चा करावी असेही कोणाला वाटू नये? मध्य प्रदेशातील रेवा जिल्हय़ात एका अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी बलात्कार केला व आता तिच्या कुटुंबासही धमकावले जात आहे. हे काही चांगल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या राज्यातील महिला अत्याचार, कायदा-सुव्यवस्था याबाबत चिंता वाटते तशी चिंता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील राज्यपालांना का वाटू नये? की तेथील राजभवनाच्या संवेदना मरून पडल्या आहेत?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

‘महाराष्ट्रातील भाजपचे महिला महामंडळही महिलांवरील अन्याय-अत्याचाराबाबत इतके आक्रमक आहे की, न्यायासाठी ते राजभवनात ठाण मांडून बसले आहे. असे जागरूक महिला महामंडळ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात नसावे याची खंत कुणास वाटू नये? रेवा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व साकीनाक्यातील घटना यात काय फरक आहे? दोन्ही घटनांत महिलांचेच बळी गेले, पण हंगामा फक्त महाराष्ट्रात होतोय. कारण, महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही व इतर दोन राज्यांत भाजपची सरकारे आहेत. त्यामुळे तेथे साधू-संतांचे मृत्यू झाले काय आणि मुलींवर अत्याचार झाले काय? कोणास काही फरक पडत नाही. ओडिशा नवीन पटनायक हे केंद्र सरकारला धरून कारभार हाकीत असतात. ते राज्य बलात्काराच्या घटनांत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा आरोप होतोय, पण ओडिशातील भाजप महिला मंडळ याप्रश्नी एकदम शांत बसले आहे,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.