Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि काँग्रेसचे करणसिंह उचियारडा अशा दोन्ही उमेदवारांनी मिरवणुकांच्या स्वागतासाठी जागोजागी फलक लावलेले दिसले. मतांचा जोगवा मागणाऱ्या दोन्ही पक्षांनी ‘रामनामा’चा जणू जप केला होता, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. जोधपूरमध्ये आल्यावर सर्वत्र दोन्ही उमेदवारांचे प्रचारफलक लक्ष वेधून घेतात. इथले तापमान महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह राममंदिर आणि कलम ३७० हटविण्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जातो. ‘कहो दिल से,… गजेंद्र दिल से…’ असे फलकावर दिसते, तर दुसरीकडे ‘जोधपूर का सेवक,… जोधपूर का बेटा’ असा नारा उचियारडा यांच्याकडून दिला जात आहे. दोन्ही उमेदवार राजपूत समाजाचे असल्यामुळे यंदा मतदार नक्की कोणत्या राजपूतामागे उभे राहणार हा कळीचा मुद्दा आहे.
सन २०१९च्या निवडणुकीसाठी याच मतदारसंघातून शेखावत यांच्या विरोधात वैभव गेहलोत यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यंदा त्यांना जालौरमधून मैदानात उतरविण्यात आले असून, काँग्रेसनेही राजपूत समाजाचा उमेदवार देऊन मतविभाजनाचा डाव खेळल्याचे चित्र दिसते. गजेंद्रसिंह शेखावत गेली दहा वर्षे इथे खासदार असूनही खुद्द जोधपूरसाठी त्यांनी ठोस असे काहीही केले नाही, असे काही स्थानिक लोक सांगतात. यंदाची निवडणूकही राममंदिर, कलम ३७० अशा राष्ट्रीय मुद्द्यांवरच लढवली जात असल्याचे दिसते.
गेली दहा वर्षे जोधपूरमध्ये फार काही बदल झाला आहे, असे वाटत नाही. येथील काही समस्या तशाच आहेत. राममंदिराचा मुद्दा यंदा महत्त्वाचा ठरेल, असे वाटते.
– संदीप जैन, स्थानिक औषध विक्रेता
काँग्रेसला परवानगी नाकारली
रामनवमीसाठी स्वतंत्र यात्रा काढण्यासाठी काँग्रेसकडून जोधपूरमध्ये परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी ती नाकारली. काँग्रेसला किंवा अगदी भाजपलाही या यात्रांमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर जालोरी गेट सर्कलमध्ये असणाऱ्या ‘जुलूस’मध्येच सहभागी व्हावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यामुळे विविध भागांत शेखावत आणि उचियारडा यांनी रामदर्शनासाठी हजेरी लावली आणि मतदारांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न केला.
ग्रामीण भागात नाराजी
जोधपूर लोकसभा मतदारसंघाचे शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग पडतात. त्यापैकी शहरी भागात शेखावत यांची हवा असल्याचे स्थानिक पत्रकार सांगतात. मात्र, ग्रामीण भागामध्ये शेखावत यांच्या विरोधात जनमत असल्याचे सांगितले जाते. जाट, बिष्णोई समाज शेखावत यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. यंदाच्या निवडणुकीत शेखावत यांचेच पारडे जड असले, तरीही येथील लढाई ‘टफ फाइट’ असल्याचे सांगितले जाते. गेल्या निवडणुकीत शेखावत २,७२,०००च्या मताधिक्याने जिंकले होते. यंदा त्यांचे मताधिक्य कमी होईल, असे चित्र आहे.