Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश

26

मुंबई, दि. १९ : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर अंदाजित १३५ कोटी रकमेचे १९९.२९ किलो अल्प्राझोलम तसेच एक वाहन आणि दोन कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास आणि कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या मुंबई पथकाने कान्हूर मेसाई तालुका शिरुर, जि.पुणे याठिकाणी एका संशयित वाहनाला अडवून त्यातील साहित्याची बारकाईने तपासणी केल्यावर संशयास्पद पावडर आणि काही प्रयोगशाळेची उपकरणे आढळून आली. याचा पाठपुरावा करताना एक गुप्त युनिट मिडगुलवाडी, (जिल्हा, पुणे) येथे सापडले. याची तपासणी करताना त्या गुप्त प्रयोगशाळेत 173.34 किलो अल्प्राझोलमचे उत्पादन कच्च्या मालासह सापडले. या गुप्त प्रयोगशाळेत अत्याधुनिक गोष्टी होत्या, यामध्ये उपकरणे, जनरेटर, ड्रायर इत्यादी साहित्य आढळून आले. पुढील एका कारवाईत नारायणगाव जवळ, ता.आंबेगाव, जि. पुणे येथे २५.९५ किलो अल्प्राझोलम कच्च्या मालाच्या प्रचंड साठ्यासोबत आणखी एक गुप्त उत्पादन युनिट आढळून आले. दोन्ही युनिट हे दुर्गम भागात जेथे वाहनाने पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी होते. याबाबतच्या सविस्तर तपासात असे आढळून आले की या दोन्ही ठिकाणी अमंलीपदार्थाचा (ड्रग्ज) पुरवठा करणाऱ्या एकाच समूहाद्वारे या गुप्त लॅब चालवल्या जात होत्या.

तसेच मंचर येथे ताडीचे दुकान चालवणारा एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अल्प्राझोलमची विक्री करताना त्याला अटक करण्यात आली. पुणे येथून या सर्व बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका महत्वाच्या सूत्रधाराची माहिती मिळाली, त्याला त्याच्या एका साथीदारासह मिरारोड, ठाणे येथून अटक करण्यात आली. या तपास प्रक्रियेत सबळ माहिती आणि आक्षेपार्हय पुरावे सापडले आहेत. अवैध उत्पादित अल्प्राझोलम महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः अवैधरित्या ताडी तयार करण्यासाठी विकले जात होते. अल्प्राझोलमचा उपयोग कृत्रिमरीत्या ताडीची क्षमता वाढवण्यासाठी आणि कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी केला जातो. अशी भेसळयुक्त ताडी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याची एक मोठी बाजारपेठ आणि समाजाच्या निम्न स्तरातील ग्राहकवर्ग याच्याकडून याची खरेदी होते.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या अशा अवैध उत्पादनाला आणि वाहतुकीला अटकाव करणाऱ्या कार्यवाहीत मोठे यश मिळाले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ

 

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.