Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्वत:ला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवता आणि वेळ आली की… भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

8

हायलाइट्स:

  • राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून भाजप आक्रमक
  • चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर जोरदार टीका
  • ही गायब होण्याची वेळ नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई: साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात महिला अत्याचाराच्या घटना एका मागोमाग एक समोर येत आहेत. डोंबिवली, कल्याण नंतर आता महाबळेश्वरमध्येही अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यावरून भारतीय जनता पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Chandrakant Patil Slams CM Uddhav Thackeray and Home Minister Dilip Walse Patil)

साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली होती. भाजपच्या महिला आघाडीनं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत या प्रश्नी कठोर कारवाईची मागणी केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांनी देशभरातील महिला अत्याचाराच्या घटनांचे दाखले दिले होते. विशेषत: भाजपशासित राज्यात महिलांवरील अत्याचार सर्वाधिक असल्याकडं राज्यपालांचं लक्ष वेधलं होतं. त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केंद्राकडं करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली होती. त्याच अधिवेशनात साकीनाक्यातील घटनेवरही चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या या उत्तरावर भाजपनं तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

वाचा: राज्य सरकारचा मोठा निर्णय! महिला पोलिसांची ड्युटी कमी होणार

हा वाद शांत होत नाहीत तोच राज्यात बलात्काराच्या आणखी तीन घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळं भाजपनं हा मुद्दा पुन्हा लावून धरत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. ‘कल्याणमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वरमध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं आहे. ही वेळ गायब होण्याची नाही, तर अत्याचाराचं हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची आहे,’ असा खोचक टोला पाटील यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना उद्देशून हाणला आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या उत्तराच्या अनुषंगानंही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. ‘आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

‘आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का?,’ असा सवालही पाटील यांनी केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.