Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पोस्टर ना बॅनर, पण ‘अंडर करंट’ जोरात; बेंगळुरुतील तीन मतदारसंघांत भाजपा विरुद्ध कॉंग्रेस

11

बेंगळुरू : लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान सहा दिवसांवर आले असले, तरी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू शहरात ना कुठे पोस्टरची गर्दी दिसते ना बॅनर. सर्वसामान्य मतदारांमध्ये मात्र निवडणुकीविषयी कमालीची उत्सुकता आहे. काहींच्या मते पुन्हा भाजपचेच उमेदवार लोकसभेत जातील, तर काहींना विधानसभेप्रमाणेच लोकसभेचाही निकाल लागेल असे वाटते. उत्तर, दक्षिण व मध्य असे तीन लोकसभा मतदारसंघ या शहरात आहेत. लागूनच बेंगळुरू ग्रामीण हा मतदारसंघ आहे. बेंगळुरू आयटी हब असल्याने येथे कन्नड नागरिकांसह अन्य राज्यांतून आलेल्यांची संख्याही मोठी आहे. येत्या शुक्रवारी येथे मतदान होत आहे.

मतदानाच्याआधीचा अखेरचा रविवार असूनही शहरात प्रचाराचा ज्वर फारसा जाणवला नाही. म्हैसुरू मार्ग, सिल्क बोर्ड, इलेक्ट्रॉनिक सिटी यासहच इतरही भागांत एकही होर्डिंग वा पोस्टर नाही. सर्वत्र लागलेले लोकप्रिय अभिनेता पुनीत राजकुमारचे होर्डिंग लक्ष वेधून घेत होते. २०२१मध्ये त्याचे निधन झाले. १७ मार्चला त्याचा जन्मदिन होता. चाहत्यांनी त्याचे स्मरण केले. रामनवमीनिमित्त लावण्यात आलेले भगवे ध्वज, पताका, श्रीरामाचे कटाउट्‌स सर्वत्र दिसत होते. भीमजयंतीनिमित्त लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कटआउटही काही भागांत नजरेस पडत होते. नाही म्हणायला, शांतीनगर भागात भाजपचे काही कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करीत होते. जयनगर, जेपीनगर, लालबाग या भागांत मात्र भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवाराचेही बॅनर होते.

नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. जयनगर बस स्थानकावर बसची प्रतीक्षा करीत असलेल्या बी. शंकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘पोस्टर लागलेले नाही म्हणजे निवडणुकीचे वातावरण नाही असे समजू नका. लोकांमध्ये अंडर करंट आहे. शातंपणे सर्वांचा प्रचार सुरू आहे. पोस्टर, बॅनर लावण्यावर मर्यादा आहे. त्यामुळे कोणी त्यावर फार भर दिलेला नाही. अयोध्येत रामाचे मंदिर झाले. येथे रामनवमी उत्साहात साजरी झाली. २०१९प्रमाणेच भाजप विजयाची पुनरावृत्ती करील.’

दक्षिण बेंगळुरूचे रहिवासी कांता राजू यांच्या मते, ‘मोदी आज जी गॅरंटी देत आहेत, ही मुळात कर्नाटकची संकल्पना आहे. मोदींनी हा शब्द कर्नाटकातून पळवला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मतदारांना गॅरंटी दिली होती. त्यांना सत्ताही मिळाली. मोदी आता तोच शब्द घेऊन मत मागत आहेत. सर्वसामान्य मतदार भाजपला मत देणार नाही. या देशावर चारशे वर्षे मोगलांचे राज्य होते. ब्रिटिशांनी राज्य केले, पण देश टिकून राहिला. देश धोक्यात येण्याची भीती भाजपवाल्यांनी घालू नये. आज कर्नाटकात गरिबांना वीज नि:शुल्क आहे. महिलांना बसमध्ये मोफत प्रवास आहे. बेरोजगारांना तीन वर्षे रक्कम दिली जाते. याच तर सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा होत्या. त्यामुळे विधानसभेप्रमाणे लोकसभेतही भाजपचा धुव्वा उडेल.’
गॅरंटी हा केवळ तीन अक्षरांचा खेळ नव्हे, नरेंद्र मोदी यांचे वर्ध्यात विरोधकांना प्रत्युत्तर
आयटीमध्ये कार्यरत दिनेश राजेंद्रन म्हणाले, ‘कोण येणार हे सांगता येत नाही, पण मोदींचे सरकार यावे असे मला वटते. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला जो सन्मान मिळत आहे ते मोदींमुळेच शक्य झाले आहे.’

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळुरू शहरात केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे, भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तेजस्वी सूर्या दक्षिण बेंगळुरूचे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून सौम्या रेड्डी लढत आहेत. ४१ वर्षीय सौम्या कर्नाटकचे परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या कन्या आहेत. बेंगळुरू मध्यमध्ये भाजपचे पी. सी. मोहन खासदार आहेत. काँग्रेसचे मन्सूर अली खान येथून लढत आहेत. भाजपचे सदानंद गौडा बेंगळुरू उत्तर मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. यंदा पक्षाने गौडा यांच्याऐवजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांना संधी दिली आहे. काँग्रेसतर्फे राजीव गौडा रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी येथे प्रचारासाठी येऊन गेले आहेत. राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्दे जास्त चर्चेत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.