Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lok Sabha Election Surat: लोकसभा निवडणूक २०२४चा पहिला निकाल जाहीर; भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड
भाजपने गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. पक्षाचे उमेदवार मुकेश दलाल यांची या मतदारसंघातून बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यानंतर या मतदारसंघातून मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार शिल्लक राहिले, ज्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. निवडणूक आयोगाकडून याची लवकरच घोषणा केली जाईल.
सुरत लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने येथील समीकरण बदलून गेले. त्यानंतर बीएसपीचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी देखील अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतला.
मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सीआर पाटील यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाता. सुरत लोकसभा मतदारसंघात बिनविरोध निवड झालेले ते पहिले खासदार ठरले आहेत. सुरतमधून अन्य कोणीच उमेदवार नसल्याने अखेर मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून याची लवकरच घोषणा केली जाणार आहे. आता गुजरातमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी सात मे रोजी मतदान होईल.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभाणी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र त्यासंदर्भात अद्याप कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख संपुष्टात आल्याने मुकेश दलाल विजयी झाले आहेत.
कोण आहेत मुकेश दलाल
सुरत लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध विजयी झालेले मुकेश दलाल हे पक्षाचे महासचिव आहेत. मोढ वणिक समाजातून आलेले मुकेश दलाल हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष पाटील यांचे अतिशय जवळचे मानले जातात. दलाल हे सुरत महानगल पालिकेचे सदस्य देखील आहेत. याआधी त्यांच्याकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील होते. त्यांनी भाजपच्या युवा मोर्चात राज्य स्तरावर काम केले आहे. ते सुरत नगर पालिकेवर पाच वेळा निवडुण गेले आहेत. त्यांच्याकडे स्थायी समितीचे ५ वेळा अध्यक्षपद होते. सुरत पिपल्स कोऑपरेटीव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्षपद देखील दलाल यांच्याकडे होते. ते १९८१ पासून भाजपमध्ये कार्यरत आहेत. या मतदारसंघातून दर्शना जरदोश या पक्षाच्या विद्यमान खासदार होत्या. यावेळी पक्षाने उमेदवार बदलला आणि मुकेश दलाल यांना संधी दिली होती.