Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Health Department Recruitment महागोंधळ: आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली; टोपे म्हणाले…
हायलाइट्स:
- आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलली.
- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली दिलगिरी.
- हॉल तिकीट गोंधळामुळे परीक्षा आधीपासूनच चर्चेत.
वाचा: गणेशोत्सवानंतर राज्यात निर्बंध कधीपर्यंत; सरकारने हायकोर्टात केलं स्पष्ट
आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील जागांसाठी ही भरती परीक्षा रद्द करावी लागली आहे. यामुळे परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबाबद्दल मी माफी मागतो व या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असे राजेश टोपे यांनी नमूद केले. टोपे यांनी या सर्वाचे खापर परीक्षेची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या न्यासा कम्युनिकेशनवर फोडले. न्यासा ही संस्था असमर्थ ठरल्यानेच परीक्षा पुढे ढकलावी लागत आहे, असे टोपे म्हणाले. परीक्षांची तारीख येत्या आठ ते दहा दिवसांत निश्चित करून नवीन तारीख जाहीर केली जाईल, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.
वाचा: रजनी पाटलांच्या बिनविरोध निवडीसाठी फडणवीसांची अट?; थोरात म्हणाले…
परीक्षेची जबाबदारी न्यासाची होती. त्यांना आवश्यक सर्व सूचना व सहकार्यही करण्यात आले. तरीही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण केली गेली नाही. सेलू येथे काही परीक्षा केंद्राना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या तयारीत त्रुटी आढळून आल्या, असंही टोपे यांनी सांगितलं. आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या ६ हजार २०० जागांसाठी या परीक्षा होणार होत्या.
नेमकं काय घडलं?
आरोग्य विभागाची परीक्षा हॉल तिकीट गोंधळामुळे आधीपासूनच चर्चेत होते. त्यात ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षार्थींना मोठा मनस्ताप झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता न्यासा कम्युनिकेशनने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर उमेदवारांच्या हिताचा विचार करत कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून गट क मधील जागांसाठीसाठी २५ सप्टेंबर रोजी होणारी आणि गट ड मधील जागांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेश पत्र मिळाल्याची खात्री करूनच सक्षमपणे आणि पारदर्शकपणे भविष्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येईल, असे आरोग्य विभागाने नमूद केले. परीक्षेची नियोजित तारीख निश्चित झाल्यावर सर्व उमेदवारांना विभागाच्या संकेतस्थळावरून, वैयक्तिक संपर्क क्रमांकावर संदेश तसेच ई-मेल याद्वारे कळवण्यात येणार आहे.
वाचा: अमित शहांसोबत बैठक; मुख्यमंत्री ठाकरेंना पवारांनी काय सांगितलं?