Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कंगनाच्या वादग्रस्त विधानांमुळे मंडी मतदारसंघामधले भाजप नेते हैराण ? विक्रमादित्यसिंह यांचा दावा

13

हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील लोकसभेच्या जागेवर ‘किंग’ विरुद्ध ‘क्वीन’ अशी चुरशीची लढत होणार आहे. पूर्वीच्या बुशहर संस्थानचे राजपुत्र, राज्यमंत्री विक्रमादित्य सिंह आणि भाजपच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रनौट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विक्रमादित्य हे सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत. विक्रमादित्य यांच्या आई प्रतिभा सिंह या मतदारसंघातील खासदार तसेच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष आहेत. तर खुद्द विक्रमादित्य सिंह सिमला ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे विक्रमादित्य यांची येथील राजकारणावरील पकड घट्ट आहे. त्यांच्यासमोर भाजपने कंगना यांना तिकीट देऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.मंडी मतदारसंघामध्ये १९५२पासूनच्या दोन पोटनिवडणुकांसह १९पैकी १३ निवडणुकांमध्ये मतदारांनी राजघराण्यांतील उमेदवारांनाच पसंती देत पूर्वीच्या संस्थानिकांच्या वंशजांना निवडून दिले आहे. सिमला ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या विक्रमादित्य सिंह यांचा चेहरा मतदारसंघात नवीन नाही. २०२१च्या लोकसभा पोटनिवडणुकीत सिंह यांनी त्यांच्या आईसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. हिमाचल प्रदेशातील मंडीच्या या जागेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘कांटे की टक्कर’ असल्याचे बोलले जाते.

उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विक्रमादित्य आणि अभिनेत्री कंगना यांच्यात खटका उडाला होता. सिंह यांनी कंगनाला ‘विवाद की रानी’ असे म्हटले होते. तर कंगनानेही त्याला प्रत्युत्तर देत, विक्रमादित्य यांना ‘छोटा पप्पू’ म्हणत हिणवले होते. गेल्याच आठवड्यात तर कंगना यांनी ‘ये तुम्हारे बाप-दादा की रियासत नहीं है, के तुम मुझे दारा, धमका के वापिस भेज दोगे’ असे म्हणत विक्रमादित्य यांना सुनावले होते. तर, ‘मी प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करतो की तिला शहाणपण द्यावे. ‘देवभूमी’ हिमाचलमधून ती बॉलिवूडमध्ये शांतपणे परत जाईल, अशी मला आशा आहे. ती निवडणूक जिंकू शकणार नाही, कारण तिला हिमाचलच्या नागरिकांबद्दल काहीच माहिती नाही’, असे सिंह यांनी म्हटले होते. काही दिवसांपूर्वीच विक्रमादित्य सिंह यांनी कंगना गोमांस खात असल्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांवर कंगना यांनीही पप्पू म्हणत तेवढ्याच तिखट भाषेत प्रत्युत्तर दिले.

मला स्टार समजू नका… कंगना रणौतनं फोडला प्रचाराचा नारळ, मंडीत रोड शो; VIDEO व्हायरल
कंगना यांची जमेची बाजू म्हणजे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जय राम ठाकूर यांची मंडीवर पकड आहे. तसेच पक्षाने लोकसभा मतदारसंघांतर्गत असलेले सर्व नऊ विधानसभा मतदारसंघ जिंकले आहेत. नोव्हेंबर, २०२१मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत प्रतिभा सिंह यांच्याकडून केवळ ७,४९० मतांच्या फरकाने पराभूत झालेले कारगिल युद्धातील एक शिलेदार आणि भाजप नेते खुशाल ठाकूर यांनीही कंगना यांना पाठिंबा दिला आहे. भाजप नेते आणि कुलूचा राजा महेश्वर सिंह यांनी यापूर्वी कंगना यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु त्यांनी आता तिला पाठिंबा दिला आहे.

श्रीनेतवर तातडीने कारवाई करा, काँग्रेसची भूमिका दाखवून द्या; नवनीत राणांची सडकून टीका

प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कंगनाबाबत एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यावर वादाचे मोहोळ उठल्यानंतर श्रीनेत यांनी आपली पोस्ट हटवली. ही पोस्ट मी नव्हे, तर कुणीतरी भलत्यानेच माझ्या खात्यावरून केल्याचा दावा त्यांनी केला हेाता. तर, काँग्रेसने महिलांचा अपमान केला आहे, असा आरोप करीत, अशा प्रकारचे कुठलेही कृत्य आमच्या पक्षात कुणी केले नाही, असे कंगना म्हणाल्या. सिराज आणि वंजार विधानसभा क्षेत्रात प्रचार करताना कंगना यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

विक्रमादित्य सिंह यांनी मात्र, ‘भाजप खोटेनाटे आरोप करीत असून, कंगना यांच्या आरोपांत कुठलेही तथ्य नाही’ असे सांगत हे आरोप फेटाळले आहेत. कंगना यांच्या येण्याने राज्य भाजप नेत्यांना असुरक्षित वाटू लागले आहे. वादग्रस्त विधानांमुळे भाजप नेते हैराण झाले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. ‘लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मी प्रदेशाच्या विकासाकरीता केंद्राकडून ३ हजार कोटी रुपये आणले. राज्यात जेव्हा महाप्रलयंकारी पाऊस पडला तेव्हा कंगना कुठे होत्य़ा? मंडीच्या हितासाठी त्यांचे योगदान काय आहे? एक सेलिब्रिटी म्हणून काम करताना आपल्या मतदारसंघाला ती न्याय कसा देणार’, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. ‘विवाद की रानी’ आणि ‘छोटा पप्पू’ यांच्यातील हा वादविवाद प्रचार संपेपर्यंत कुठल्या थराला पोहोचतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

कंगना रनौट

कंगना यांची जमेची बाजू म्हणजे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जय राम ठाकूर यांचे समर्थन. कुलूचा राजा महेश्वर सिंह यांनी कंगना यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. परंतु त्यांनी आता तिला पाठिंबा दिला आहे.

विक्रमादित्य सिंह
हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र असलेल्या विक्रमादित्य यांचा सिमला ग्रामीण विधानसभा क्षेत्रात यांचा मोठा जनसंपर्क आहे. विक्रमादित्य हे याच मतदारसंघातून दोनदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.