Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
- १ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचा समावेश
- वाळूशिल्प स्पर्धा, बीच रन स्पर्धेचे आयोजन
सिंधुदुर्ग दि.24 (जिमाका): सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 मे रोजी लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी किशारे तावडे यांच्या संकल्पनेतून SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मतदान जनजागृती कार्यक्रमाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ‘स्वीप’ अंतर्गत मालवण नगरपरीषदेमार्फत वाळूशिल्प स्पर्धा, बीच रन, मतदान करण्याबाबत शपथ अशा विविध उपक्रमांचे आयाेजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे उपस्थित होत्या. यावेळी मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, गट विकास अधिकारी आत्मज मोरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सह आयुक्त मत्स्यविभाग सागर कुवेसकर, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले उपस्थित होते. मतदान जनजागृती मोहिमेस शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवाभावी संस्था, महिला बचत गट, युवा मतदार, ज्येष्ठ मतदार, महिला मतदार, स्थानिक मच्छिमार असे अंदाजे 1000 पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते.
मतदान जनजागृतीसाठी वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन-
मालवण बंदर जेटी येथे मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कुडाळकर हायस्कूल, प्राथमिक व माध्यमिक शाळा, टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, कन्याशाळा या शाळांनी सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धकांनी तयार केलेली मतदानाचा संदेश देणारी बोलकी वाळू शिल्पे विशेष आकर्षण ठरली. या स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलने प्रथम क्रमांक, कन्याशाळा द्वितीय क्रमांक तर जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूलने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
बीच रन आणि शपथेच्या माध्यमातून प्रशासनाकडून मतदारांना मतदानाचे आवाहन –
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी हिरवा झेंडा दाखवून बीच रनला सुरुवात केली. मतदारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी युवा मतदार, ज्येष्ठ मतदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, महिला, सेवाभावी संस्था यांनी उत्साहाने या बीच रन मध्ये सहभागी होऊन घोषणा व माहिती फलकाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले. बीच रनचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी विशेष सुविधा दिलेली असल्याने उपस्थितांनी सेल्फी घेऊन मतदार करण्याचा संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतरांना दिला.
यावेळी युवा मतदार रीना मराळ व हितेश सावंत तसेच ज्येष्ठ मतदार श्री श्रीकांत वेंगुर्लेकर यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. भंडारी हायस्कूलच्या शिक्षिका सौ राधा दिघे यांनी लोकशाहीच्या बळकटी करणासाठी मतदानाचे महत्व अधोरेखित केले तर प्राध्यापक नागेश कदम आणि शिक्षिका श्वेता यादव यांनीही आपल्या मनोगतातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
केंद्रस्तरीय अधिकारी, ग्रामस्तरीय अधिकारी, शिक्षक, आशा सेविका यांच्या माध्यमातून प्रशासन मतदार नोंदणीसाठी सदैव नागरिकांच्या घरोघरी कार्यरत असते; मतदान हा नागरिकांना दिलेला हक्क आहेच पण मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे व मतदानाचा हक्क बजावताना तो जबाबदारीने बजावला पाहिजे; ज्याप्रकारे आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतो त्याच प्रकारे मतदानाचे कर्तव्यही आपण तितक्याच गांभीर्याने बजावले पाहिजे असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी केले.
मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आपल्या मनोगतात मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संपूर्ण देशात सुरु आहे. भारताची लोकसंख्या 142 कोटी असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 95 कोटीहून अधिक मतदार नोंद झालेली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मिळालेला मतदानाचा हक्क आणि यातून मानवतेच्या मूल्यांना व लोकशाहीला मिळालेली बळकटी अधोरेखित करून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून विशेष मोहीम राबवत असल्याचे म्हटले व मतदान जनजागृती कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. सर्व उपस्थितांना दिनांक 7 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून तुमच्या संपर्कातील मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन करून आपल्या मतदारसंघाच्या मतदान टक्केवारी वाढीसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा तांत्रिक तज्ञ निखिल नाईक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
०००००००