Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मटा ग्राउंड रिपोर्ट : उदयपूर लोकसभा रिंगणामध्ये यंदा तिरंगी लढत, दोन माजी प्रशासकीय अधिकारीही रिंगणात

9

उदयपूर (राजस्थान) : राजस्थानाच्या पर्यटन नकाशावरील एक महत्त्वाचे शहर असणाऱ्या उदयपूर लोकसभा रिंगणामध्ये यंदा तिरंगी लढत होत आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि भारतीय आदिवासी पक्ष या तिघांनी अनुक्रमे मन्नालाल रावत, ताराचंद मीना आणि प्रकाशचंद्र बुझ यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, येथील शहरी मतदार काहीसा भाजपकडे झुकल्याचे चित्र आहे.धार्मिक अस्मितेची पाळेमुळे घट्ट रुतलेल्या राजस्थानात गेल्या आठवड्यात रामनवमीच्या निमित्ताने जे दिसले, तेच हनुमान जन्मोत्सवाच्या संध्येलाही दिसले. गावात ठिकठिकाणी हनुमान मंदिरात भजन, कीर्तनाचे आयोजन केले होते; तर बहुतांश ठिकाणी प्रसाद म्हणून भोजन दिले जात होते. या सर्व धार्मिक उपक्रमांमध्ये थेट कोणत्याही राजकीय पक्षाचा उल्लेख नसला, तरीही हिंदुत्ववादी संघटना आणि इतर संघटनांकडून हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना एक व्यापक आणि दरवर्षीपेक्षा काहीसे मोठे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला, असे काही स्थानिक नागरिकांना वाटले.

शहरात काय वातावरण?

उदयपूरमध्ये ठिकठिकाणी मन्नालाल रावत आणि ताराचंद मीना यांचे प्रचारफलक लावलेले दिसले. मात्र, तुलनेत प्रकाशचंद्र यांचे फलक दिसले नाहीत. जगदीश मंदिर, गणगौर घाट, सूरजपोल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले दिसले. धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न येथेही केलेला दिसला.

उमेदवारांची पार्श्वभूमी

निवडणूक लढवत असलेले भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी आहेत. भाजपचे मन्नालाल रावत उदयपूरचे परिवहन आयुक्त होते; तर ताराचंद मीना उदयपूरचे जिल्हाधिकारी होते. तिसरे उमेदवार प्रकाशचंद्र बूझ काँग्रेसची मते खातील, असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करतात. या लोकसभा मतदारसंघातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. कलम ३७०, राममंदिर, तिहेरी तलाक आदी मुद्द्यांवर भाजपने येथे जोरदार प्रचार केला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रॅलीलाही मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या रॅलीचे फलक अद्याप शहरात जागोजागी दिसतात. त्यामुळे येथे प्रचारामध्ये भाजपची आघाडी झालेली दिसते.

जातीचे ‘गणित’

उदयपूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी (एसटी) आरक्षण असलेला मतदारसंघ आहे. येथे भाजपचे सध्याचे खासदार अर्जुनलाल मीना यांचे तिकीट कापून भाजपने मन्नालाल रावत यांना तिकीट दिले आहे. त्यातही गंमत अशी की, काँग्रेससोबत आघाडी असूनही भारतीय आदिवासी पक्षाने येथून उमेदवार उभा केला आहे. त्याचा थेट फायदा भाजपला होणार आणि काँग्रेसच्या मतांची विभागणी होणार, हे उघड आहे.
रणसंग्रामात ‘गदर-३’मुळे रंगत, बाडमेर-जैसलमेरमधील तिरंगी लढतीकडे लक्ष, हातपंपाचा इतिहास काय?
नागरिकांना काय वाटते?

गणगौर घाट परिसरातील काही जणांशी बोलल्यावर त्यापैकी बहुतांश जणांनी आपण भाजपचे मतदार असल्याचे ठामपणे सांगितले. चहावाला राजपालसिंह राठोड याने तर दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र असलेले स्टिकर लावले आहेत. त्याला विचारले असता, ‘उदयपूर-अहमदाबाद ट्रेन सुरू करून भाजपने येथील पर्यटनासाठी फायदा करून दिला आहे. काही वर्षांमध्ये मतदारसंघात बदल घडले आहेत.’, असे तो म्हणाला. ‘गेल्या पाच वर्षांत भाजपच्या उमेदवाराने आमच्यासाठी काहीही केले नाही. मात्र, आम्ही मोदी यांच्याकडे पाहून मतदान करणार’, असे याच बाजारपेठेतील रमेशचंद्र तांबोळी म्हणाले. आणखी एक दुकानदार योगेश चंद्रसिंह याला महागाईच्या मुद्द्याबाबत विचारले. ‘गेल्या काही वर्षांत नागरिकांचे वार्षिक उत्पन्नही वाढले आहे. मात्र, महागाईची झळ बसते आहे. कदाचित काही कालावधीनंतर ती कमी होईल’, असे त्याने सांगितले.

राजस्थानात प्रचारतोफा थंडावल्या

उदयपूर : राजस्थानात दुसऱ्या टप्प्यात; शुक्रवारी टोंक-सवाई माधोपूर, अजमेर, पाली, जोधपूर, बाडमेर, जालौर, उदयपूर, बांसवाडा, चितोडगड, राजसमंद, भिलवाडा, कोटा आणि झालावाड-बारां अशा १३ मतदारसंघांत मतदान होत आहे. त्यासाठी प्रचार बुधवारी संपला. काही आठवड्यांत प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या स्टार प्रचारकांनी सहभाग नोंदवला. शेवटच्या टप्प्यात अभिनेत्री कंगना रनोटने मंगळवारी रोड शो केले; तसेच बुधवारीही तिचे रोड शो झाले. पाली, जोधपूर, बाडमेर, जैसलमेर येथे तिने केलेल्या ‘रोड शो’ला प्रतिसाद मिळाला. याशिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही मंगळवारी प्रचार केला. दुसरीकडे काँग्रेसचे केंद्रातील स्टार प्रचारक सहभागी न झाल्यामुळे सारी मदार गेहलोत पिता-पुत्र, सचिन पायलट आणि गोविंदसिंह डोटासरा यांनी सांभाळल्याचे चित्र होते. पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी येऊन गेले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.