Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
यापूर्वी या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार होते. मात्र मध्य प्रदेशातील बैतुलमधील बसपच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने, आता या जागेवर ७ मे रोजी निवडणूक होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गजेंद्र शेखावत, कैलास चौधरी व राजीव चंद्रशेखर हे तीन केंद्रीय मंत्री, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, हेमामलिनी, सुरेश गोपी व अरुण गोविल हे तीन चित्रपट तारे यांचे भवितव्य या टप्प्यात यंत्रबंद होणार आहे.
भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत या ८८ जागांपैकी सर्वाधिक तब्बल ५० जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएच्या मित्रपक्षांनी आठ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला २१ व इतरांना नऊ जागा मिळाल्या होत्या.
यंदाच्या काही लक्षणीय लढतींमध्ये केरळमधील वायनाड जागेवरील तिरंगी लढतीत राहुल गांधींचा मुकाबला भाकपच्या ॲनी राजा व भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्याशी होणार आहे. तिरुअनंतपुरम मतदारसंघातून तीन वेळा काँग्रेसकडून खासदार झालेले शशी थरूर यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना तिकीट दिले आहे. कोटा येथून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची लढत काँग्रेसचे प्रल्हाद गुंजाल यांच्याशी आहे. ‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना मेरठमधून सपच्या सुनीता वर्मा यांचे आव्हान आहे. प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांना भाजपने मथुरेतून तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे. बसपने कमलकांत उपमन्यु यांचे तिकीट कापून ईडी व सीबीआयचे माजी अधिकारी व संघ स्वयंसेवक सुरेश सिंह यांना दिले आहे. छत्तीसगडच्या राजनांदगावमधील भाजपची १९९९पासूनची मक्तेदारी मोडून काढण्याचे आव्हान घेऊन काँग्रेसने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना येथून उमेदवारी दिली आहे. भाजपने विद्यमान खासदार संतोष पांडे यांना पुन्हा तिकीट दिले आहे.
३३ टक्के उमेदवार कोट्यधीश
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार, दुसऱ्या टप्प्यातील ३९० म्हणजे ३३ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. सहा उमेदवारांनी त्यांची संपत्ती शून्य घोषित केली आहे. आपल्याकडे केवळ ५०० ते १००० रुपये असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्यांमध्ये नांदेडचे अपक्ष उमेदवार लक्ष्मण नागोराव पाटील, कासरगोड, केरळ येथील राजेश्वरी केआर आणि अमरावतीचे पृथ्वीसम्राट मुकींद्राव दीपवंश यांचा समावेश आहे.