Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोऱ्या पाटीवर भाजपची मदार, नवख्या पल्लवी धेंपे यांना दक्षिण गोव्यातून उमेदवारी

7

पणजी (गोवा) : दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे आकडे जाहीर केले आणि त्या एकाएकी चर्चेत आल्या. पल्लवी यांची आणि त्यांच्या पतीची एकूण मालमत्ता १३६१.४० कोटी रुपये आहे.पल्लवी आणि त्यांचे पती श्रीनिवास धेंपे यांचा धेंपे उद्योग समूह रिअल इस्टेट, जहाजबांधणी, शिक्षण, खाणकाम क्षेत्रात व्यवसाय करतो. पल्लवी या धेंपे इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आहेत. पल्लवी यांनी नुकताच उमेदवारी अर्ज भरला. आपल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची स्वत:ची जंगम मालमत्ता २५५ कोटी रुपये असून, त्यांचे पती श्रीनिवास यांच्याकडे ९९४ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. दोघांकडे अनुक्रमे २८.२ कोटी रुपये आणि ८३.२ कोटी रुपये स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय दुबई आणि लंडनमध्येही या दाम्पत्याची मालमत्ता आहे.
‘नोटा’पेक्षा कमी मतं मिळणाऱ्यांवर पाच वर्ष बंदी घाला, सुप्रीम कोर्टात याचिका, निवडणूक आयोगाकडे चेंडू

भारतीय जनता पक्षाने गोव्यात प्रथमच लोकसभा निवडणुकीसाठी महिला उमेदवार दिला आहे. ४९ वर्षीय पल्लवी धेंपे या राजकारणात नवख्या आहेत. त्या श्रीमंत घरातील असल्याने गोरगरीबांच्या व्यथा त्यांना कळतील का, असा प्रश्न विचारला जात आहे. राजकारणाचा अनुभव त्यांच्या हाती नाही, असा प्रचारही त्यांच्याविरोधात केला जात आहे. पल्लवी यांचे पती श्रीनिवास धेंपे यांचे पणजोबा वैकुंठराव धेंपे यांनी १९६३मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. भाजपच्या आमदार देविया राणे या पल्लवी यांच्या चुलत बहीण आहेत.

पल्लवी यांचे महाविद्यालयीन शिक्षण गोव्यात झाले असून, त्यांनी पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात पदवी मिळविली आहे; तसेच पुण्यातील ‘एमआयटीत’तून त्यांनी ‘एमबीए’ केले आहे. २०१२ ते २०१६ या काळात त्यांनी गोवा विद्यापीठाशी संलग्न शैक्षणिक परिषदेच्या सदस्य म्हणूनही काम केले आहे. धेंपे चॅरिटीज ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत. या माध्यमातून त्या वंचितांच्या मदतीसाठी संस्था चालवतात. मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी काही सरकारी शाळा दत्तक घेतल्या आहेत. इंडो-जर्मन एज्युकेशनल अँड कल्चरल सोसायटीच्या त्या अध्यक्ष आहेत. गोवा कॅन्सर सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीच्या त्या सदस्य आहेत. अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात पल्लवी सक्रिय आहेत; मात्र राजकारणात नवीन असल्याने नागरिकांशी मतदारांच्या नात्याने जनसंपर्क वाढविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

धेंपे ग्रुप नुकताच आणखी एका कारणामुळे चर्चेत आला होता, ते म्हणजे प्रसिद्ध झालेला इलेक्टोरल बाँडचा डेटा. यानुसार श्रीनिवास धेंपे यांनी १.२५ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड्स विकत घेतले होते. त्यांच्या कंपनीच्या उपकंपन्यांनीही इलेक्टोरल बाँडद्वारे देणगी दिली आहे. या देणग्यांमुळेच पल्लवी यांना भाजपने उमेदवारी दिल्याची चर्चा होती. विरोधकांनीही या मुद्द्यावरून भाजपवर टीका केली होती. पल्लवी यांनी मात्र आपल्यावरील टीकेला अद्याप प्रत्युत्तर दिलेले नाही. आपण सकारात्मक प्रचार करण्यावर भर देणार असल्याचे त्या सांगतात.

२०१४मध्ये दक्षिण गोवा मतदारसंघातून भाजपचे नरेंद्र सावईकर निवडून आले होते. मात्र, २०१९मध्ये पुन्हा ही जागा काँग्रेसच्या फ्रान्सिस्को सर्दिन्हा यांनी जिंकली. सर्दिन्हा यांनी २,०१,५६१ मते मिळवून भाजपच्या सावईकर यांचा (१,९१,८०६) अवघ्या दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे यंदाही भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. नवीन चेहरा दिल्यास भाजपला फायदा होईल, असा अंदाज बांधून भाजपने यंदा पल्लवी यांची निवड केली आहे. पल्लवी ती सार्थ ठरवतात का, ते लवकरच कळेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.