Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
काँग्रेसच्या ‘फुटी’च्या अजेंड्याविरोधात जनजागृती करा; पंतप्रधान मोदीं यांचे ‘रालोआ’च्या उमेदवारांना पत्राद्वारे सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारसभांमध्ये काँग्रेसवर एका मागोमाग एक आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यातच आता पंतप्रधानांनी काँग्रेसवर ‘विभाजनवादा’चा आरोप केला आहे. याबाबत ‘रालोआ’च्या उमेदवारांना मोदींनी वैयक्तिक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांवर फूट पाडण्याचा आणि भेदभाव करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला. तसेच धर्माच्या आधारे आरक्षण हे घटनाबाह्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
‘काँग्रेस लोकांचे कष्टाचे पैसे हिसकावून त्यांच्या व्होट बँकेला देण्यासाठी ‘वारसा करा’सारख्या धोकादायक योजना आणणार असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. त्याला रोखण्यासाठी देशाला संघटित व्हावे लागेल,’ असेही मोदींनी पत्रात नमूद केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात पंतप्रधानांनी त्यांचे पक्षातील सर्वात मौल्यवान कार्यकर्त्यांपैकी एक असे वर्णन केले आहे. केंद्रात आणि त्याआधी गुजरातमध्ये मंत्री असताना त्यांनी केलेल्या कार्यकाळाचेही त्यांनी कौतुक केले.
आणीबाणीच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना पाठिंबा देऊन शहा यांनी वयाच्या १३व्या वर्षी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली, असे मोदींनी नमूद केले. १९८०पासूनचे शहा यांच्याशी असलेले नात्याचीही त्यांनी यावेळी आठवण करून दिली.
भाजपला मिळालेले प्रत्येक मत हे २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासाला गती देईल, असेही मोदी यांनी या पत्रात नमूद केले आहे.
राज्यघटना बदलण्यााचा काँग्रेसचा खोटा प्रचार
गुवाहाटी : भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलून आरक्षण संपवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे, असा खोटा प्रचार काँग्रेस करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. नागरिकांच्या आशीर्वादाने आणि पाठिंब्याने भाजप लोकसभा निवडणुकीत ४००हून अधिक जागा जिंकण्याच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असल्याचा दावाही शहा यांनी यावेळी केला. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलेल आणि आरक्षण संपवेल, असा खोटा प्रचार काँग्रेस करीत आहे. आम्ही मतदारांना अल्पसंख्याक किंवा बहुसंख्य म्हणून पाहत नाही. आसाममध्ये लोकसभेच्या १४पैकी १२ जागा भाजप जिंकेल.’ भाजप धर्माच्या आधारावर आरक्षण यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही देशभर एकसमान नागरी संहिता लागू करण्याच्या आणि सर्व धर्मांच्या लोकांसाठी एकच कायदा असण्याच्या बाजूने आहोत, असेही शहा म्हणाले.
…..‘म्हणून ममता दीदी अनुपस्थित’
मेमारी (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहिल्या नाहीत, कारण त्यांना त्यांची ‘घुसखोर व्होट बँक’ नाराज होण्याची भीती होती, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केला. पूर्व वर्धमान जिल्ह्यातील मेमारी येथे एका सभेला संबोधित करताना शहा यांनी हा हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशात ‘परिवार राज’ हवा की, ‘रामराज्य’ हे लोकसभेच्या निवडणुका ठरवतील. ते म्हणाले, ‘अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी आपल्या देशातील जनता आणि रामभक्तांची वर्षानुवर्षे इच्छा होती. पण काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांना हे नको होते. ममता दीदी आणि त्यांचा पुतण्या (अभिषेक बॅनर्जी) या दोघांनाही प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रणे पाठवण्यात आली होती. पण ते सहभागी झाले नाहीत, कारण त्यांची ‘घुसखोर व्होट बँक’ नाराज होण्याची भीती होती.’