Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवसारीत संमिश्र लोकवस्ती आहे. संपूर्ण भारतच वसलेला आहे. सी. आर. पाटील मराठा समाजाचे; तर नैशद देसाई ब्राह्मण. मात्र, इथे कोणतीही जातीय समीकरणे नाहीत. कोणत्याही एका समाजाचे वर्चस्वही नाही. नवसारी लोकसभेत बहुतांश भाग सुरतचा आहे. जालापोर, नवसारी, गणदेवी हे तीन तालुके नवसारी जिल्ह्यातील; तर लिंबायत, उधना, मजुरा, चौऱ्यासी हे चार तालुके सुरत जिल्ह्यातील आहेत. सी. आर. पाटील यांना ‘पाटीलसाब’ नावाने ओळखले जाते. एरव्ही इथे प्रत्येकाच्या नावानंतर ‘भाई’ हे आदरार्थी नाव जोडले जाते. मात्र, पाटील एकमेव अपवाद आहेत. त्यांना पाटीलसाहेब म्हणूनच ओळखले जाते. नाही म्हटले तरी मराठी माणसाचे विशेषत: खान्देश भागाचे वर्चस्व स्पष्टपणे जाणवते. कारण लिंबायतमध्ये भाजपच्या संगीता पाटील या मराठी महिला आमदार आहेत. त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांचे माहेर जळगावच्या पारोळा तालुक्यातले, तर सासर शिरपूरचे. या उलट काँग्रेसला या मतदारसंघावर पकड मिळवता आलेली नाही. कारण लोकांपर्यंत जाण्यासाठी जी नियोजनबद्ध संपर्क यंत्रणा हवी, ती नाही.
‘पेज कमिट्यां’वर पाटीलसाहेबांची भिस्त
सी. आर. पाटील यांची भिस्त पेज कमिट्यांवर म्हणजे पान समित्यांवर आहे. पेज कमिटी म्हणजे मतदारसंघाच्या एका पानावर जी काही ४०-४२ मतदारांची नावे असतात, त्या पानासाठी ७ ते ९ जणांची एक समिती केली आहे. या समितीने फक्त या पानावरील मतदारांवरच लक्ष ठेवायचे. अशा तीनशेपर्यंत समित्या नियुक्त केल्या आहेत. या समितीचा सदस्य प्रत्येक सोसायटी, घराघरांत कार्यरत आहे, अशी माहिती भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष छोटूभाई पाटील यांनी दिली.
गर्व झाल्याची काँग्रेसची टीका
मतांच्या विक्रमी आघाडीवरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. काँग्रेस ओबीसी सेलचे शहराध्यक्ष कल्पेश बारोट यांनी सांगितले, की पाटील यांना मतदारांपेक्षा ईव्हीएमवर जास्त विश्वास आहे. ते दहा लाखांपेक्षा जास्त आघाडी घेण्याचा एवढाच विश्वास आहे, तर मग उमेदवारांना खरेदी करण्याचा प्रयत्न का करतात? बलसाड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार अनंत पटेल यांच्याविरुद्ध ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे तीनच कार्यकर्ते भाजपकडे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
मतदार निरुत्साही
मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे कुठेही बॅनर, झेंडे दिसत नाहीत. फक्त रॅलींवर भर दिला जातो. नवसारीत मंगळवारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी वेगवेगळ्या रॅली काढली. निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले. रिक्षाचालक मनोज शुक्ला याला निवडणुकीबाबत कोणतीही उत्सुकता वाटत नाही. पाटीलच निवडून येणार, नवीन काही नाही, इतक्या सहजपणे त्याने मत व्यक्त केले. दांडी यात्रेच्या स्मृतिस्थळाला भेट देणारे व्यावसायिक संदीप खाचोरिया यांनी राजकारणाचा स्तर घसरत चालल्याचे मत नोंदवले. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात उद्योग, व्यावसायिकांना चांगली सबसिडी मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.